त्यांच्या सतर्कतेमुळे हरवलेली खुशी दोन तासांत आईच्या कुशीत

शिक्रापूर पोलिसांची दमदार कामगिरी

शिक्रापूर (पुणे) – येथे हिंगोलीहून पाहुणे म्हणून आलेल्या महिलेची अडीच वर्षाची मुलगी हरवली होती. शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे त्या मुलीला दोन तासांत आईच्या ताब्यात देण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले आहे. खुशी राहूल पाईकराव, असे त्या चिमुकलीचे नाव आहे.

शिक्रापूर येथील पाबळ चौक येथे असलेल्या व्ही मार्ट मॉलजवळ 25 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास एक अडीच वर्षाची मुलगी बेधरलेल्या अवस्थेत होती. त्यावेळी व्ही मार्ट मॉलचे संचालक यांनी तेथून जाणारे शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई मयुर कुंभार यांना माहिती देत त्या मुलीला त्यांच्या ताब्यात दिले. यावेळी मुलगी रडत होती, तिला नाव, पत्ता सांगता येत नव्हते, दरम्यान शिक्रापूर गावठाण परिसरात पाहुणे म्हणून आलेल्या एका कुटुंबियांची लहान मुलगी हरवली असल्याची माहिती पोलीस शिपाई मयुर कुंभार यांना मिळाली.

कुंभार यांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेत तेथील प्रकाराबाबत चौकशी केली. त्यानंतर मुलगी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे असल्याचे कुटुंबीयांना सांगितले. नंतर मुलीची आई आशा राहूल पाईकराव (रा. शेनगाव ता. शेनगाव जि. हिंगोली) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे धाव घेतली. त्यावेळी त्यांची हरवलेली मुलगी खुशी पोलिसांच्या जवळ बसून खाऊ खाताना दिसून आली. यावेळी खुशीच्या आईने आनंद व्यक्‍त करत शिक्रापूर पोलिसांचे आभार मानले. यावेळी सहायक पोलीस उपनिरीक्षक अनिल ढेकणे, पोलीस शिपाई मयुर कुंभार, राहुल मोडमोडे, महिला पोलीस कर्मचारी गीता बराटे यांनी मुलीला तिच्या पालकांच्या ताब्यात दिले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.