#पुणे : रेल्वे पार्किंगमागे सापडले हॅण्डग्रेनाईड; बीडीडीएसने केले उध्वस्त

खातरजमा करण्यासाठी तुकडे पाठवले फॉरेंन्सिक लॅबला

पुणे – ताडीवाला रस्त्यावरील रेल्वे पार्किंगच्या मागील रस्त्यावर एक हॅण्डग्रेनाईड सदुश्‍य वस्तू सापडली. तब्बल चार तासांच्या प्रयत्नानंतर पुणे पोलिसांच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकाने स्फोट घडवून ही वस्तू निकामी केली. लष्कराला ही यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. दरम्यान नष्ट केलेल्या हॅण्डग्रेनाईड सदुश्‍य वस्तूचे अंश पुढील तपासासाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले आहेत.

ताडीवाला रस्त्यावर रेल्वे प्रशासनाचे मुख्य कार्यालय आहे. त्या शेजारीच रेल्वे स्थानकाच्या फलाटावर जाण्यासाठी पादाचारी उड्डाणपुल आहे. या पुला शेजारी असलेल्या पार्किंगच्या मागील रस्त्यावर साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याला हॅण्डग्रेनाईड सदुश्‍य वस्तू आढळली. त्याने तातडीने याची खबर रेल्वे पोलिसांना दिली. तेथे रेल्वे सुरक्षा बल एएसआय संतोष बडे आणी कॉन्स्टेबल विकास पाटील दाखल झाले. त्यांनी प्रथम श्‍वान पथकाला याची खबर दिली. यानंतर पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली.

घटनास्थळी तातडीने बंडगार्डन पोलीसांचे पथक आणी बीडीडीएस पथक दाखल झाले. त्यांनी परिसर सिल करुन पहाणी केली असता, हॅण्डग्रेनेड सारख वस्तू दिसली. वस्तू धोकादायक असल्याचे लक्षात येताच तातडीने तीला रेल्वेच्या रिकाम्या मैदानात नेण्यात आले. तेथे ही वस्तू स्फोट घडवून नष्ट करण्यात आली. यानंतर त्याचे अंश गोळा करुन पुढील तपासणीसाठी नेण्यात आले. घटनास्थळी सहायक पोलीस आयुक्त रविंद्र रसाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल तांबे आदी  सहायक आयुक्त आर. पी. एफ सी एस चेंगप्प, निरीक्षक आर.पी. एफ सुहास कांबळे आणि उप निरीक्षक अजित कोल्हे व बापूसाहेब कायगुडे दाखल झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.