राजगड पोलीस, महामार्ग प्राधिकरणची कारवाई
खेड-शिवापूर-येथील कोंढणपुर फाटा येथील उड्डाण पुलाखाली असलेल्या अतिक्रमणावर गुरुवारी (दि. 30) राजगड पोलीस आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने कारवाई केली आहे. त्यामुळे या उड्डाण पुलाखालील रस्त्यावरील अडथळा दूर झाला आहे.
कोंढपुर फाटा येथील पुलाखाली झाल्यापासून काही महिन्यांपासून वाहनतळ झाले होते. अनेक छोट्या व्यवसायिकांनी या पुलाच्या दोनही बाजूस आपले छोटे व्यवसाय सुरु केले होते. त्यामुळे उड्डाण पुलाखाली वाहतुकीला मोठा अडथळा झाला होता. या ठिकाणी मोठी वाहने वळविण्यास अडथळा निर्माण झाला होता. पुला शेजारी बसस्थानक आहे. त्यामुळे प्रवाशांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता.
त्यामुळे बुधवारी राजगड, महामार्ग पोलीस आणि प्राधिकरण विभागाने येथील विक्रेते आणि वाहन चालकांना वाहने उभी करण्याबाबत सूचना दिली होती. मात्र गुरुवारी सकाळी या ठिकाणी पुन्हा विविध व्यवसायिकांनी आपली दुकाने थाटली. त्यामुळे रागजड पोलीस आणि प्राधिकरण विभागाने उड्डाण पुलाखालील व्यवसायिकांची दुकाने हटविली. यावेळी राजगडचे फौजदार समीर कदम, पोलीस हवालदार प्रमोद भोसले, सुधीर खडतरे, अमित कांबळे यांनी ही करवाई केली.