कोयत्याच्या धाकाने लुटणारा जेरबंद

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाची कारवाई

शिक्रापूर- शिक्रापूर (ता. शिरूर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पुणे-नगर महामार्गावर कोंढापुरी गावाच्या हद्दीमध्ये रात्रीच्या वेळेस टेम्पो चालकाला कोयत्याचा धाक दाखवून लुटणाऱ्या संशयित आरोपीस अटक करण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले असून आरोपीस शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अभय चव्हाण ( वय 20) रा. धामारी ता. शिरूर मूळ राहणार मेरगळवाडी ता. दौंड, असे त्याचे नाव आहे.

कोंढापुरी (ता. शिरूर) येथे 13 ऑक्‍टोबर 2019 रोजी रात्रीच्या सुमारास सुभाष मापारी हे त्यांच्या ताब्यातील (एम.एच 12 आर एन 7545) या टेम्पोमध्ये काही माल घेऊन सुपा येथून मुंबई येथे निघाले होते. रात्रीच्या तीनच्या सुमारास मापारी हे रस्त्याचे कडेला काही गाड्या असलेल्या ठिकाणी टेम्पो लाऊन झोपले. त्यांनतर रात्रीच्या वेळी दोघे जण हातामध्ये कोयता घेऊन आले व त्यांनी टेम्पोची काच फोडून टेम्पोत प्रवेश केला व मापारी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी मापारी यांच्या मानेवर कोयता ठेवत मापारी यांच्या खिशातील वीस हजार रुपये व मोबाइल देखील काढून घेत पोबारा केला होता. याबाबत सुभाष संपत मापारी रा. राळेगणसिद्धी ता. पारनेर जि. अहमदनगर यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. त्यानुसार शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला होता.

  • सापळा रचून घेतले ताब्यात
    गुन्ह्यातील आरोपी धामारी गावच्याहद्दीमध्ये असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली. त्यांनतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय गिरमकर, दयानंद निम्हण, पोलीस नाईक ज्ञानेश्वर क्षीरसागर, राजू मोमीन, जनार्दन शेळके, अक्षय नवले, उमाकांत कुंजीर यांनी धामारी या ठिकाणी सापळा रचून अभय चव्हाण यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याच्या एका साथीदाराच्या मदतीने गुन्हा केल्याचे कबुली दिली. त्यानंतर त्याला शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके हे करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.