वाराणसी – उत्तर प्रदेशातील ज्ञानवापी मशिद 1991 नंतर आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मशिदीच्या आतल्या परिसरात शृंगार देवीची रोज पुजा करू देण्याची मागणी महिलांनी केल्यानंतर या भागात तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे पुढच्या काळात हे प्रकरण चिघळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
अलिकडेच या मशिदीच्या परिसरात व्हिडिओ सर्वेक्षण करण्यात आले होते. तेव्हा हिंदु धर्मियांचे स्वस्तिकचे चिन्ह तेथे आढळून आल्यावर हा वाद सुरू झाला आहे. ही चिन्हे प्राचिन काळातील असल्याचे सर्वेक्षण करणाऱ्यांचे म्हणणे आहे, तर हा प्रकार झाल्यानंतर सर्वेक्षणालाच विरोध करत 100 पेक्षा जास्त मुस्लिम धर्मियांनी मशिदीला वेढा घातल्याने सर्वेक्षण थांबवण्यात आले.
वाराणसीतल्याच एका न्यायालयाने मशिदीच्या बाहेरच्या भागाचे व्हिडिओ सर्वेक्षण सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर जेव्हा सर्वेक्षण करण्यासाठी टीम तेथे गेली तेव्हा वातावरण चांगलेच तापले होते व मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
मशिदीच्या बाहेरच्या भिंतीवर शृंगार देवीच्या मूर्त्या आहेत. तेथे आम्हाला रोज पुजा करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी करत पाच महिलांनी 18 ऑगस्ट 2021 रोजी न्यायालयाचे दार ठोठावले. आतापर्यंत परंपरेनुसार येथे वर्षातून केवळ दोनच दिवस देवीची पुजा केली जात होती. आता ती रोज करण्याची मागणी आहे. त्यानंतरच मंदीर परिसरात व्हिडिओ सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले होते.
न्यायालयाने 10 मे पर्यंत आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश संबधितांना दिले होते. मात्र शनिवारी दुसऱ्या दिवशी या सर्वेक्षणाला जोरदार विरोध करण्यात आला. शंभरपेक्षा जास्त जणांच्या जमावाने मशिदीभोवती मानवी कडे उभारून ते रोखले.
1991 मध्येही ज्ञानवापी मशिदीच्या संदर्भात न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. ही जमीन काशी विश्वनाथाची असून अनेक लहान मंदिरे तोडून मशिद उभारण्यात आली असल्याचा दावा त्या याचिकेत करण्यात आला होता. दरम्यान, वाराणसीतील एका व्यास नवाच्या कुटुंबाने या जमीनीवर आपला मालकी हक्क सांगितला असून गेल्या 150 वर्षांपासून आम्ही या जमीनीसाठी न्यायालयीन लढा लढतोय असे त्यांचे म्हणणे आहे.