नवी दिल्ली – इस्राईल आणि हमास यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. इस्राईलने मंगळावरी गाजा पट्टीवर हमासच्या ठिकाणांवर हल्ले चढवले. सीमावर्ती भागात मंगळवारी फिलीस्तीन एन्क्लेव्हकडून आग लावलणारे फुगे सोडल्यानंतर इस्राईलने प्रत्युत्तरात हल्ले केले. यामुळे इस्राईल-हमास यांच्यातील मागील ११ दिवसांची युद्धबंदी संपुष्टात आली आहे.
या युद्धात इस्रायलच्या सैन्याचा भाग असलेल्या अवघ्या 20 वर्षांच्या नित्शा मुलियाशा या तरुणीच्या पराक्रमाची विशेष चर्चा होत आहे. भारतीय वंशांची नित्शा मूळची गुजरातमधील राजकोट जिल्ह्यातील मनावदार तालुक्यातील कोठाडी गावची आहे. ती सध्या इस्रायल डिफेन्स फोर्सेसच्या टीममध्ये सहभागी आहे. गाझा पट्टीत (Gaza) मंगळवारी पुन्हा हल्ले सुरू करण्यात तिची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.
इस्रायलच्या तेल अवीव शहरात राहत असलेली नित्शा इस्रायलच्या सैन्यात भरती होणारी पहिली गुजराती मुलगी आहे. इस्रायलच्या शिक्षणव्यवस्थेमुळेच आपली मुलगी आज सैन्यात पराक्रम दाखवते आहे, असं नित्शाचे वडील जीवाभाई सांगतात.
इस्रायलच्या सैन्यासोबत नित्शाचा 2.4 वर्षांचा करार झाला आहे. तेवढ्या कालावधीत तिला सैनिक म्हणून जबाबदारी निभावणं आवश्यक आहे. त्यानंतर तिच्याशी पाच किंवा 10 वर्षांचा शैक्षणिक करार केला जाणार आहे. त्याअंतर्गत तिला तिच्या योग्यतेनुसार इंजिनीअरिंग, मेडिकल किंवा आपल्या आवडीचं अन्य शिक्षण घेता येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे तिच्या या उच्च शिक्षणाचा सगळा खर्च सैन्याकडून केला जाणार आहे.
नित्शाचे वडील जीवाभाई यांनी सांगितलं की, नित्शा मागील दोन वर्षांत लेबनान, सिरिया, जॉर्डन आणि इजिप्तच्या सीमेवर तैणात होती. सध्या ती गश डानमध्ये तैणात असून इस्राईलच्या येथून हमासच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत आहे.