पुणे -सलामीवीर शुभमन गिलची 84 धावांची खेळी आणि लॉकी फर्ग्युसनने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या मदतीने गुजरात टायटन्सने 14 धावांनी विजय मिळविला. गुजरातने दिलेल्या 172 धावांचा पाठलाग करताना दिल्लीचा डाव 157 धावांवर संपुष्टात आला.
निर्धारित धावांचा पाठलाग करताना लॉकी फर्ग्युसनने आपल्या पहिल्याच षटकांत दिल्लीला दोन झटके दिले. आधी त्याने सलामीवीर पृथ्वी शॉला शंकरकरवी झेलबाद केले. तो 7 चेंडूत 10 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर मनदीपसिंगला बाद करत गुजरातला मोठा दिलासा मळवून दिला.
कर्णधार ऋषभ पंत आणि ललित यादव यांनी 61 धावांची भागीदारी केली. परंतु ललित यादव धावबाद झाल्याने ही भागीदारी संपुष्टात आली. यानंतर फर्ग्युसन आणि मोहम्मद शामीने एकदाच षटकात दोन-दोन विकेट घेत दिल्लीचे कंबरडे मोडले. यामुळे दिल्लीला 20 षटकांत 9 बाद 157 धावापर्यंतच मजल मारता आली. गुजरातकडून लॉकी फर्ग्युसनने 4, तर मोहम्मद शामीने दोन विकेट घेतल्या.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजीस आलेल्या गुजरातची सुरुवात निराशाजनक ठरली. मॅथ्यू वेड विचित्र फटका खेळताना एक धाव काढून बाद झाला. विजय शंकरदेखील 13 धावांत माघारी परतला. त्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या आणि शुभमन गिल यांच्यात 65 धावांची निर्णायक भागीदारी झाली. हार्दिक चांगली सुरुवात मिळूनही 31 धावांवर माघारी परतला. पण शुभमन गिलने शानदार अर्धशतक झळकावले. तो शतकाच्या नजीक पोहोचत असतानाच झेलबाद झाला. त्याने 6 चौकार आणि 4 षटकार खेचत 46 चेंडूत 84 धावा केल्या.
शुभमन गिल बाद झाल्यावर राहुल तेवतीया आणि डेव्हिड मिलर जोडीने शेवटच्या काही षटकांमध्ये फटकेबाजी करत धावांची गती वाढविली. तसेच तेवतीयाने 8 चेंडूत 14 धावा, तर मिलरने नाबाद 20 धावा केल्या. दिल्लीकडून आजच्या सामन्यात पहिल्यांदाच संधी मिळालेल्या मुस्तफिजूर रहमानने 3 विकेट घेतल्या.
संक्षिप्त धावफलक
गुजरात टायटन्स : 20 षटकांत 6 बाद 171 (शुभमन गिल 84, हार्दिक पांड्या 31, डेव्हिड मिलर नाबाद 20, राहुल तेवतिया 14. मुस्तफिजूर रहमान 3-23, खलील अहमद 2-34) दिल्ली कॅपिटल्स् : 20 षटकांत 9 बाद 157 (मनदिप सिंग 18, ऋषभ पंत 34, ललित यादव 25, रोव्हमन पॉवेल 20. लॉकी फर्ग्युसन 4-28, मोहम्मद शामी 2-30)