गांधीनगर – गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील गोघंबा येथे असलेल्या गुजरात फ्लोरोकेमिकल्स लिमिटेड मध्ये स्फोट झाल्यामुळे भीषण आग लागली. या स्फोटात तिघांचा मृत्यू झाला असून 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. स्फोट इतका भीषण होता की स्फोटाचा आवाज अनेक किलोमीटर दूर ऐकू आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटात तिघांचा मृत्यू झाला असून 15हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात हलवण्यात येत आहे. गुरुवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच खासगी कंपनीसह जिल्हा प्रशासनाच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवत आहेत. दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांचे पथक आवारात कोणी अडकले आहे का याचा शोध घेत आहे. स्फोटाच्या प्रकाराबाबत अधिक माहिती गोळा केली जात आहे. गुजरात फ्लोरोकेमिकल्स लिमिटेड (GFL) ही फ्लोरिन रसायनशास्त्रातील 30 वर्षांहून अधिक अनुभव असलेली भारतीय रासायनिक कंपनी आहे. ज्या प्लांटमध्ये स्फोट झाला तो जीएफएल चा भारतातील सर्वात मोठा रेफ्रिजरंट प्लांट होता.