नाचक्की झाल्याने पक्षाने बजावली कारणे दाखवा नोटीस
सुरत : दारूबंदी लागू असणाऱ्या गुजरातमधील भाजपच्या एका नगरसेवकाने मद्यधुंद अवस्थेत नृत्य करून स्वपक्षाचीच मोठी नाचक्की केली. त्या कृत्याची गंभीर दखल घेऊन भाजपने संबंधित नगरसेवकाला कारणे दाखवा नोटीस बजावली. आता त्या नगरसेवकाला पक्षातून निलंबित केले जाण्याची शक्यता आहे.
गुजरातच्या किनारपट्टीलगत असणाऱ्या एका गावातील फार्महाऊसवर एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्या पार्टीत भाजपचा नगरसेवक कथितपणे दारू पिऊन नाचत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला. त्यामुळे गोची झालेल्या भाजपला त्या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी लागली.
गुजरातसारख्या राज्यात एका लोकप्रतिनिधीची अशाप्रकारची वर्तणूक स्वीकारार्ह नसल्याची भूमिका भाजपच्या सुरत शाखेने घेतली. दरम्यान, वादाच्या केंद्रस्थानी आलेल्या नगरसेवकाने पार्टीत मद्य प्राशन केल्याचे नाकारले.
व्हिडीओत दिसत असलेल्या बाटलीत फळाचा रस होता. नृत्य करणे हा काही गुन्हा नाही, अशी प्रतिक्रिया त्या नगरसेवक महोदयाने दिली. अर्थात, आरोग्याच्या कारणास्तव आपल्याला मद्य परवाना मंजूर करण्यात आला असल्याचेही त्या नगरसेवकाने मान्य केले.