लखनौ : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते स्वामी चिन्मयानंद यांना बलात्कार प्रकरणात इलाहाबाद हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. उत्तर प्रदेशातील शहाजहांपूर येथील कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थीनीवर कथित बलात्कार प्रकरणात स्वामी चिन्मयानंद यांना इलाहाबाद हायकोर्टाने सोमवारी जामीन मंजूर केला. हायकोर्टाने 16 नोव्हेंबर झालेल्या सुनावणीवेळी आपला निर्णय राखून ठेवला होता.
या बलात्कार प्रकरणातील नाट्यमय घडामोडींनंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार गतवर्षी सप्टेंबर महिन्यात चिन्मयानंद यांना अटक करण्यात आली होती. एसआयटीच्या पथकाने उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने चिन्मयानंद यांना मुमुक्षू आश्रमातून अटक केली होती.
चिन्मयानंद यांच्यावर त्यांच्याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका एलएलएमच्या विद्यार्थीनीने बलात्कार आणि ब्लॅकमेलिंग केल्याचा आरोप आहे. या आरोपानंतर ही मुलगी काही दिवस अचानक गायब झाली होती. दरम्यान, तिच्या पालकांनी यामागे चिन्मयानंद यांचाच हात असल्याचा आरोप करीत पोलिसांत तक्रार दाखल केली होती.