गांधीनगर – गुजरात विधानसभा निवडणुक 2022साठी आज दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडले. यावेळी जवळपास 59 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील 93 जागांसाठी आज मतदान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मतदानासाठी जाताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोड शो केला. त्यावरून पंतप्रधानांनी रोड शो करून आचार संहितेचा भंग केल्याचा आरोप करत काॅंग्रेसने निवडणुक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. काॅंग्रेस नेते योगेश रवाणी यांनी याबाबत तक्रार केली आहे.
“भाजपचा झेंडा घेऊन आणि भगवा स्कार्फ परिधान केलेले मोदी राणीप येथील मतदान केंद्रापासून 500 ते 600 मीटर अंतरावर उतरले आणि आजूबाजूला जमलेल्या लोकांसोबत फिरले, असे योगेश रवाणी यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, आज मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडला. यानंतर आता 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असून सत्ता कोणाच्या पारड्यात पडते हे स्पष्ट होणार आहे. निवडणुक निकालाकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, गुजरात विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान 1 डिसेंबर रोजी पार पडलं होतं. पहिल्या टप्प्यातील 19 जिल्ह्यातील 89 विधानसभा मतदारसंघासाठी 63 टक्के मतदान झालं होतं.