नवी दिल्ली – भारतीय हवाई दलासाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. 27 फेब्रुवारी 2019 रोजी हवाई युद्धात पाकिस्तानी F-16 लढाऊ विमानास पाडणारे ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांना आज राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते वीर चक्र प्रदान करण्यात येणार आहे.
सोबतच जम्मू- काश्मीरमधील कारवाईदरम्यान A++ श्रेणीतील दहशतवाद्याला ठार केल्याबद्दल नायब सुभेदार सोंबीर यांना मरणोत्तर शौर्य चक्र प्रदान केले जाईल. याशिवाय पाच दहशतवाद्यांचा खात्मा करणारे मेजर विभूती शंकर धौंडियाल यांनाही मरणोत्तर शौर्य चक्र प्रदान करण्यात येणार आहे. तसेच प्रकाश जाधव यांना मरणोत्तर दुसरा सर्वोच्च कीर्ती चक्र पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. जाधव यांनी जम्मू-काश्मीरमध्ये कारवाईदरम्यान दहशतवाद्यांना हुसकावून लावले होते.
दरम्यान, माजी पूर्व लष्कर कमांडर लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (सेवानिवृत्त), अभियंता-इन-चीफ लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग, दक्षिण नौदल कमांडर व्हाइस अॅडमिरल अनिल चावला यांना परम विशिष्ट सेवा पदक प्रदान केले जाईल. दुसरीकडे, ईस्टर्न एअर कमांडर एअर मार्शल दिलीप पटनायक यांना अति विशिष्ट सेवा पदक देण्यात येणार आहे.