पवनानगर (वार्ताहर) – श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, स्थानिक उत्सव समिती महाड आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची 344 वी पुण्यतिथी, अभिवादन कार्यक्रम चैत्र पौर्णिमेला झाला. हजारो दिव्यांनी शिवसमाधी व जगदीश्वर मंदीर परिसर उजळून निघाला होता. त्यामुळे वातावरण शिवमय झाले होते.
मंगळवारी (दि. २३) सकाळी जगदीश्वर मंदिरात महापूजा, हनुमान जयंतीनिमित्त कीर्तन व राजदरबारात श्री शिवप्रतिमापूजन केले. या वेळी लोहगड विसापूर विकास मंचाच्या वतीने शिवसमाधीस्थान व जगदीश्वर मंदिर प्रांगणात दीपवंदनेद्वारे महाराजांना अभिवादन करण्यात आले. रात्री जगदीश्वर मंदिरात हरी जागर व राजदरबारात इतिहास अभ्यासकांची मुलाखती, सैन्यदलातील अधिकाऱ्यांच्या मुलाखती तसेच शाहिरीचे कार्यक्रम झाले.
यावर्षी शिवपुण्यतिथी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थांनचे अध्यक्ष ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज मोरे (देहूकर) उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दीपवंदना झाली. तर, समाधी स्थानावरील दीपवंदना सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे वंशज कर्नल समीर गुजर यांचे हस्ते करण्यात आली.
राजदरबारातील कार्यक्रमानंतर श्री शिवप्रतिमा पालखी मिरवणूक झाली. या वेळी श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार ज्येष्ठ पुरातत्ववेत्ते आणि मूर्तिशास्त्र अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांना जाहीर करण्यात आला होता. सदर पुरस्कार त्यांना पुण्यातील कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह सुधीर थोरात, सरकार्यवाह पांडुरंग बलकवडे, अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे, स्थानिक उत्सव समिती महाडचे कार्यवाह संतोष कदम, अध्यक्ष त्रिंबक पुरोहित यांनी नियोजन केले. शिवसमाधी व जगदीश्वर मंदिरात दीपवंदना या कार्यक्रमाची जबाबदारी लोहगड विसापूर विकास मंचाकडे होती,
अशी माहिती मंचचे संस्थापक सचिन टेकवडे व अध्यक्ष विश्वास दौंडकर यांनी दिली. दीपवंदनेचे नियोजन संस्थापक सचिन टेकवडे, अध्यक्ष विश्वास दौंडकर, अनिकेत आंबेकर, महेश सोनपावले, अजय मयेकर, संदीप भालेकर, सिद्धेश जाधव आदींनी केले.