पवनानगर, (वार्ताहर) – लोहगडाचे नामांकन नुकतेच युनोस्कोसाठी झाले आहे. गडावर आता सुधारणा होत असून पुरातत्व विभाग त्या दृष्टीने कामे करत आहेत.लोहगडावरील महादरवाजाचा बुरुज पुन्हा दिमाखात उभा असून लोहगडाची वाटचाल आता वैभवशालीतेकडे चालली आहे.
गडावर सर्वप्रथम श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंचाने शिव मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंच गेली 25 वर्षे या ठिकाणी काम करत आहे .स्थानिक ग्रामस्थ व लोहगड विसापूर विकास मंच एकत्र या ठिकाणी काम करत आहे. त्याचबरोबर पुरातत्व विभागाने गणेश दरवाजा, हनुमान दरवाजा, पायऱ्यांचे कामे, विंचू कडावरील सेफ्टी ग्रील, काही बांधकामांचे उत्खनन, तटबंदीवरील बांधकामे आदी कामे केली आहे.
गडावरील बांधकामे अनेक शतके उभी आहेत. त्यामुळे जीर्ण झाल्यामुळे काही बांधकामे ढासळतात. महादरवाज्याचा बुरुज असाच काही वर्षांपूर्वी ढासळला होता. लोहगड विसापूर विकास मंचातर्फे त्यावेळेस पुरातत्व विभागाला निवेदन दिले होते. नुकताच हा बुरुज पुन्हा एकदा बांधला.
आहे त्यासाठी पुरातत्त्व विभागाचे अधिकारी गजानन मांडवरे यांनी यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे महादरवाजाचा बुरुज आता पुन्हा दिमाखात उभा आहे. तसेच या विभागातर्फे गडावर सीसीटीव्ही पण बसविण्यात आले आहेत त्यामुळे गडावरील सर्व हालचालीवर पुरातत्व विभागाचे आता लक्ष राहील.
या सुविधा हव्यात
गडावरील शिव मंदिराचा काही भाग अजूनही बांधायचा आहे. मंदिरासमोर फरशी फुटली आहे. मंदिरासमोरील भिंती पूर्ण ढासळल्या आहेत. गडावर स्वच्छतागृहाची व्यवस्था नसल्यामुळे महिला पर्यटकांना अडचण निर्माण होते. पाणी पिण्यासाठी वॉटर कुलरची गरज आहे. शिवमंदिराच्या बांधकामाची मागणी मंचातर्फे करण्यात आली आहे.
सात वाजता गड उघडण्याची मागणी
मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे यांनी सांगितले की, पूर्वी गड हा सूर्योदयला उघडायचा व सूर्यास्ताला बंद व्हायचा. आता गड सूर्यास्ताला बंद होतो, पण सकाळी नऊ वाजता उघडतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटकांना लोहगड उघडण्याची वाट बघावी लागते. उन्हाळ्यामध्ये पर्यटकांना सकाळी लवकर गडावर जायचे असते, त्यांना जाता येत नाही.
त्यामुळे शनिवारी, रविवारी सकाळी सात वाजता गड उघडावा, अशी मागणी मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे, मार्गदर्शक संदीप गाडे अध्यक्ष विश्वास दौंडकर, कार्याध्यक्ष सागर कुंभार, अनिकेत आंबेकर, सचिन निंबाळकर, गणेश उंडे, अजय मयेकर, अमोल गोरे, बसप्पा भंडारी, चेतन जोशी यांनी केली आहे.