श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील अंवतीपोरामध्ये आज (गुरुवार) भारतीय जवानांना मोठे यश मिळाले आहे. जवानांकडून या भागात शोधमोहीम राबवली जात असताना, अल-बदर या दहशतवादी संघटनेच्या चार दहशतवाद्यांना जीवंत पकडण्यात आले आहे. या कारवाईनंतर संपूर्ण परिसरात कडेकोट बंदोबस्त करण्यात आला.
शिवाय, दहशतवाद्यांनी लपवून ठेवलेला शस्त्रसाठा देखील हस्तगत करण्यात आला. ज्यामध्ये एक एके 56 रायफल, एक एके 56 मॅनजीन, एक हॅण्ड ग्रेनेड आणि 28 काडतूसांचा समावेश आहे.
या अगोदर जम्मू-काश्मीरमधील पूंछमधील दुर्गन पोशाणा भागात झालेल्या चकमकीत, दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते. याशिवाय दहशतवाद्यांच्या एका सहकाऱ्यास अटकही करण्यात आली होती.
तर, पूंछ जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या सैनिकांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करून केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) एक उपनिरीक्षक शहीद झाले होते.