बेल्हे – करोनामुळे शेतीप्रधान असलेल्या जुन्नर तालुक्याचे अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. लाखो एकर क्षेत्रामध्ये असणाऱ्या विविध पिकांना बाजारभाव नसल्याने पीक अक्षरशः जनावरांना घालण्याची वेळ बळीराजावर आली आहे. जुन्नर तालुक्यात द्राक्ष बागायत क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे.
सुरुवातीच्या टप्प्यात असणाऱ्या द्राक्ष बागांची जरी चांगले पैसे झाले असले तरी नंतरच्या टप्प्यात असणाऱ्या द्राक्षबागा मात्र करोनाच्या विळख्यात सापडल्या आहेत. करोनामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी हताश झाले आहेत. काढलेली द्राक्ष विकायची कुठे, असा मोठा प्रश्न द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे.
जुन्नर तालुक्यात दरवर्षी परदेशात निर्यात करून शेतकरी कोट्यवधी रुपये मिळवत असतात.
मात्र, यावर्षी करोनाचे मोठं संकट द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर आले आहे. विशेष करून जुन्नर तालुक्यातील जंबो, शरद सीडलेस, तास गणेश थॉमसन या जातीच्या द्राक्षांना परदेशात चांगली मागणी व चांगला बाजारभाव मिळत असतो.
फेब्रुवारी व मार्च महिन्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांला जंबो द्राक्षांना परदेशात चांगला बाजारभाव मिळाला. जम्बो द्राक्षांना प्रतवारीनुसार 110 ते 140 रूपये बाजारभाव मिळाला तर दुय्यम दर्जाच्या द्राक्षांना 60 ते 70 रूपये बाजारभाव मिळत होता.
देशावर व राज्यावर करोनाचे संकट आल्याने द्राक्षाला प्रतिकिलो 10 ते 20 रुपये बाजारभाव शेतकऱ्यांना मिळत आहे. अत्यंत कमी भाव व द्राक्षाला मागणी नसल्याने काही शेतकरी द्राक्षाचे मनुके बनवत आहेत.
द्राक्ष परिपक्व होईपर्यंत मोठी मेहनत शेतकऱ्यांना घ्यावी लागते. पिकाला पाणी देणे, खत घालणे, मजूर, फवारणी करणे यासाठी मोठा खर्च शेतकऱ्यांना येतो. सध्या पिकाला केलेला खर्च सुद्धा शेतकऱ्यांना मिळत नाही.
यावर्षी अवकाळी पावसाने शेतकरी हताश झाला होता. या संकटातून बाहेत येत असताना त्यात करोनाचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे. यातून तरी चार पैसे मिळून पिकासाठी केलेला खर्च तरी मिळेल, अशी आशा
शेतकऱ्यांना आहे.
द्राक्ष छाटणीला मजूर मिळत नाहीत. तसेच किरकोळ विक्रीसाठी बाहेर जाताही येत नाही. गाडीला पेट्रोल किंवा डिझेलही मिळत नाही. चांगल्या दर्जाची द्राक्षे कवडीमोल भावाने विकावी लागत आहेत. शेतकरीवर्ग मेटाकुटीस आला आहे. करोनाचे मोठे संकट द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर कोसळले आहे. शासनाने मदत करण्याची मागणी केली आहे.
– भूपाल माडिवाले, द्राक्ष उत्पादक शेतकरी, बेल्हे.
जम्बो जातीच्या द्राक्षांचे उत्पादन राज्यात जुन्नर तालुक्यात सर्वाधिक निघत आहे. जुन्नर तालुक्यात द्राक्ष लागवडीसाठी सुमारे साडेचार हजार ते पाच हजार एकर क्षेत्रांवर लागवडी झालेल्या आहेत. गेल्यावर्षी सत्तर एकर क्षेत्रांवर लागवडी झालेल्या होत्या. यावर्षी अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. करोनामुळे परदेशात निर्यात होणाऱ्या द्राक्षांवर बंदी असल्याने व बाजारपेठ उपलब्ध नसल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.
– हिरामण शेवाळे, तालुका कृषी अधिकारी, जुन्नर.
शेवटच्या टप्प्यात निर्यातीला फटका
करोनाच्या संकटापूर्वी द्राक्षे श्रीलंका, चीन, रशिया, जर्मनी, युरोप, युके आदी देशांमध्ये जात होती. तालुक्यातुन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पंधरा कंटेनरमधून दोनशे टन द्राक्षे परदेशात निर्यात केलेली आहेत. यामधून तालुक्यातील शेतकऱ्यांना पावणेदोन कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले होते.