पुणे – महापालिकेच्या स्थापत्य विभागातील अभियंत्याने शहरात करोनाचे सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अवघ्या 35 रुपयांत सुरक्षा मास्क तयार केले आहे.
अभियंता श्रीकांत गायकवाड यांनी हातरुमाल आणि बाजारात मिळणाऱ्या फिल्म पेपरपासून दोन वेगवेगळ्या प्रकारचे मास्क तयार केले आहेत. त्याच्या या मास्कची दखल घेत पालिकेच्या अभियंता संघाकडून सुमारे 2 हजार मास्क तयार करून घेतले जाणार असून शहरातील सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ते देण्यात येणार आहेत.
करोनाशी लढाई असलेल्या लॉकडाऊनच्या काळात गायकवाड यांनी तयार केलेल्या या मास्कचे कौतुक होत असून काही मास्क कर्मचाऱ्यांना वापरण्यासही देण्यात आले आहेत. दरम्यान, पालिकेच्या अभियंत्याने केलेल्या या प्रयत्नांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. इतर कर्मचाऱ्यांना याचा फायदा होत आहे.
अशी सूचली कल्पना
गायकवाड हे येरवडा क्षेत्रीय कार्यालाय येथे शाखा अभियंता आहेत. कार्यालयात दररोज सर्वेक्षण करणारे कर्मचारी माहिती देण्यासाठी येतात, तेव्हा त्यांच्याकडे सर्वेक्षणासाठी मास्क आहेत. त्याने डोळे तसेच चेहऱ्याच्या इतर भागाचे संरक्षण होत नाही. त्यामुळे गायकवाड यांनी मुलगा नचिकेत याच्या मदतीने रुमाल वापरून संपूर्ण चेहरा झाकणारा मास्क बनविला आहे. तसेच बाजारात मिळणारी फिल्म वापरुन विंड शिल्ड मास्कही तयार केला आहे. या दोन्ही मास्कला प्रत्येकी 35 रुपये खर्च येतो. तसेच ते धुवून पुन्हा वापरता येणार असल्याचे गायकवाड यांनी “प्रभात’शी बोलताना सांगितले.