हिंजवडी – कुटुंबात आजोबा आणि नातवाचं एक आपुलकी व जिव्हाळ्याचे नाते असते. परंतु आजोबांचे संस्कार व शिकवण आचरणात आणणाऱ्या नातवाने आपल्या आजोबांचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून केलेले व्रत एका अनोख्या पद्धतीने सोडले. याचा प्रत्यय आयटी पार्क लगतच्या नेरे गावातील ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील नागरिकांना आला.
तीनचार वर्षांपूर्वी संपूर्ण कुटुंबाला करोनाने ग्रासले. गावात स्वच्छतादूत म्हणून प्रसिद्ध असलेल्या आजोबांना करोनाची लागण होऊ नये, ते हयात असेपर्यंत मी दाढी व केस कापणार नाही, असा संकल्प नातवाने आई तुळजाभवानी चरणी केला. दरम्यान चमत्कार तो असा झाला की, आजोबांना करोना तर सोडाच, मरेपर्यंत अन्य कुठलाही आजार जडला नाही. अखेर आपल्या आयुष्याचे शतक पूर्ण करून 102 व्या वर्षी या आजोबांचे निधन झाले. त्यांच्या मरणोत्तर नातवाने वाढविलेली केस व दाढीचे केशदान कर्करोगग्रस्तांना करत गावात स्वच्छता मोहीम राबवून आजोबांना अनोखी श्रद्धांजली वाहिली.
नेरे दत्तवाडीतील हनुमंत जाधव यांचे संपूर्ण कुटुंब करोनाच्या माहामारीत करोना संसर्गामुळे विळख्यात सापडले. तेव्हा स्वच्छतादूत असलेले 98 वर्षीय हभप विष्णू लक्ष्मण जाधव या प्रिय आजोबांना करोना संसर्ग झाल्यास काही अघटीत घडू नये, त्यांना करोनाची लागण होऊ नये, ते दीर्घायुषी व्हावेत म्हणून उद्योजक व पोलीस मित्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप जाधव या नातवाने दाढी आणि केस न कापण्याचा संकल्प तुळजाभवानी चरणी केला होता. तेव्हापासून तब्बल तीन चार वर्षे ते केस दाढी वाढवून फिरत होते. परंतु आजोबांनी वयाच्या 102 व्या वर्षी वृद्धापकाळाने नुकताच अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या स्मृती समाजाच्या उपयोगी पडाव्यात म्हणून गेली चार वर्षे दाढी, केस न कापणाऱ्या नातू संदीप जाधव यांनी निगा राखून वाढलेले लांबलचक व मुलायम डोक्याचे (22 इंच), दाढीचे (18 इंच) केस मुंबईतील कॅन्सर आधार मदत चॅरिटेबल ट्रस्टला कॅन्सरग्रस्त रुग्णांचे विग (टोप) बनविण्यासाठी दान केले.
आजोबा हे नेहमी स्वच्छतेची कास धरणारे होते. करोना काळातही ते स्वतः निगा राखायचे. घरातील सर्व जण करोना संसर्गाने बाधित झाल्याने आता आजोबांचे काय होणार ही भीती मनात असल्याने देवीला साकडे घातले होते. या संकटातून माझ्या आजोबांना वाचव मी तोपर्यंत डोक्याचे केस व दाढी कापणार नाही असा नवस केला होता. तुळजाभवानी मातेने तो ऐकला व आजोबा शतायुषी झाले. म्हणून त्यांच्या मरणोत्तर हे केशदान व श्रमदान केले.
– संदीप जाधव, जिल्हा अध्यक्ष पोलीस मित्र संघटना.