कॅनिंग (पश्चिम बंगाल) – पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात तृणमुल कॉंग्रेसच्या एका नवनिर्वाचित पंचायत सदस्याची अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्याच्यासोबत असलेली आणखी एक व्यक्ती गोळी लागल्याने गंभीर जखमी झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही हत्या राजकीय वैमनस्यातून की वैयक्तिक वैमनस्यातून, याचा तपास पोलीस करत आहेत.
मग्राहाट पूर्व ग्रामपंचायत सदस्य मैमूर घरामी हे शुक्रवारी रात्री उशिरा घरी परतत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. अज्ञात बंदूकधाऱ्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यात ते जागीच ठार झाले पण मारेकऱ्यांनी त्यांच्या मृत्यूची खात्री करण्यासाठी त्याच्यावर धारदार वस्तूने वारही केले. घरामीसोबत असलेला शाहजहान मोल्ला हा त्यांच्या मदतीसाठी धावला पण त्याच्यावरही गोळ्या झाडण्यात आल्या.