Bhagat Singh Koshyari – राज्याचे वादग्रस्त ठरलेले तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आता एका नवीन अडचणीत सापडू शकतात. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिलेल्या उत्तरात महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे परिवार प्रबंधक कार्यालयाने स्पष्ट केले आहे की, भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यपाल असताना त्यांच्या संबंधित असलेल्या संस्थेसाठी वसुललेल्या देणग्यांची माहिती त्यांच्या कार्यालयाशी संबंधित नाही.
गलगली यांनी भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यपाल असताना त्यांच्या संबंधित असलेल्या सरस्वती शिशु मंदिर, पिठोरगड, विवेकानंद विद्या मंदिर इंटर कॉलेज, पिठोरगड आणि सरस्वती विहार हायर सेकंडरी, नैनिताल या शैक्षणिक संस्थेसाठी राज्यातील उद्योगपती, विकासक आणि अन्य लोकांकडून घेतलेल्या देणग्यांची सविस्तर माहिती मागितली होती. महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे परिवार प्रबंधक कार्यालयाच्या कार्यालयीन अधिक्षिकऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, मागितलेली माहिती त्यांच्या कार्यालयाशी संबंधित नाही. तरी आपण संबंधित संस्थेशी संपर्क साधावा.
त्यावर आता गलगली यांचे म्हणणे आहे की, कोश्यारी यांनी राज्यपाल असताना खासगी संस्थेसाठी देणग्या वसूल केल्या असून त्यांनी तशी माहिती राज्य सरकार आणि राज्यपालांचे परिवार प्रबंधक कार्यालयाकडे देणे आवश्यक होते. तशी माहिती न दिल्यास राज्यपालांचे परिवार प्रबंधक यांनी त्यांसकडे लेखी पत्र पाठवून माहिती मागवित ती माहिती अभिलेखावर जतन केली पाहिजे.
राज्यपालांनी गुपचूपपणे घेतलेल्या देणग्यांची माहिती लपवली आहे. याबाबत राज्य शासनाने चौकशी करणे अगत्याचे आहे, अशी मागणी अनिल गलगली यांनी विद्यमान राज्यपाल रमेश बैस सहित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.