अकोले -आरोग्य कर्मचारी, शासकीय कर्मचारी रात्रंदिवस परिश्रम घेऊन करोना साथीशी लढत आहेत. त्यामुळे तेच खरे करोना योद्धे आहेत, असे प्रशंसोद्गार आ. डॉ. किरण लहामटे यांनी काढले.
अकोले तालुक्यात कोविड-19 चा मुकाबला करण्याच्या लढ्यात काम करणाऱ्या नगरपंचायत, पंचायत समिती, अकोले, कळस ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना आज एम. एच. एल. संचालित डॉ. राधेशाम गुंजाळ इनस्टिट्यूट, होमीओपॅथी कॉलेज व हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने करोना आजाराविरुद्ध प्रतिकारशक्ति वाढवणारे औषध आ. डॉ. लहामटे यांच्या हस्ते पंचायत समिती आवारात वाटप करण्यात आले.
तेंव्हा ते बोलत होते. तहसीलदार मुकेश कांबळे, भास्कर रेंगडे, आरोग्य अधिकारी डॉ. इंद्रजित गंभिरे यावेळी उपस्थित होते. आरोग्य कर्मचारी वर्गाचा अनेक लोकांशी थेट संपर्क येत असतो. त्यामुळे कर्मचारी वर्ग स्वतः असुरक्षिततेची भावना व्यक्त करत असतो. त्यांना सुरक्षितता देणे आपल्या सर्वांची नौतिक जबाबदारी असते, असे आ. डॉ. लहामटे म्हणाले.
आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, पोलीस, वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आपली काळजी घ्यावी. तसेच या औषधांचा पुरवठा टप्या टप्प्याने वाढवण्यात येईल, अशी हमी आ. डॉ. लहामटे यांनी दिली. डॉ. पूनम ढगे यांनी सामाजिक बांधिलकीतून होमिओपॅथिक कॉलेज व हॉस्पिटलतर्फे हा औषध पुरवठा केला. तसेच कर्मचाऱ्यांनी हे औषध कसे घ्यावे, या माहिती दिली. डॉ. राधेशाम गुंजाळ कॉलेजचे डॉ. सुनील मदने, डॉ. काशिनाथ गुंजाळ, विवेक उंबरकर यांनी या औषध वाटपास सहकार्य केले.
याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष रवी मालुंजकर, शहराध्यक्ष अमित नाईकवाडी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते संदीप शेणकर, युवा नेते राजेंद्र कुमकर, महेश तिकांडे, राज वाकचौरे, प्रभात चौधरी उपस्थित होते.