पुणे – ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी कायमच आघाडीवर असलेल्या दि विश्वेश्वर सहकारी बॅंकेला महाराष्ट्र को- ऑपरेटिव्ह बॅंक फेडरेशन लिमिटेड, मुंबई यांच्या वतीने सर्वोत्कृष्ट बॅंक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. 2022-23 वर्षासाठी दि विश्वेश्वर सहकारी बॅंकेस 2500 कोटी ठेवी असलेल्या बॅंक गटातून सर्वोत्कृष्ट बॅंक असा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
दिल्ली येथील नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक्स अँड क्रेडिट सोसायटीज लि. अर्थात एनएएफसीयुबीच्या राष्ट्रीय परिषदेत सहकार मंत्री अमित शहा यांचा सत्कार करण्याची संधी दि विश्वेश्वर बॅंकेचे अध्यक्ष अनिल गाडवे यांना मिळाली. तज्ज्ञ संचालक डॉ. चिंतामणी वैजापूरकर व बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम आपटे यावेळी उपस्थित होते. नुकतेच दि विश्वेश्वर सहकारी बॅंकेच्या इचलकरंजी शाखेचे उद्घाटन झाले.
बॅंकेने सप्टेंबर 2023 अखेर एकूण व्यवसायाचा 3100 कोटी रुपयांचा पल्ला गाठला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत व्यवसायात 350 कोटी रुपयांनी वाढ केली आहे. वर्ष 2022-23 करिता सभासदांना 10 टक्के लाभांश अदा करण्यास मान्यता देण्यात आली असून बॅंकेच्या इन्स्टाग्राम व फेसबुक पेजचे उद्घाटन करण्यात आले.
लवकरच लातूर येथे नवीन शाखा सुरू करण्यात येणार असून नजीकच्या भविष्यात एकूण व्यवसाय 5000 कोटीपर्यंत नेण्याचा अध्यक्ष गाडवे यांचा निर्धार आहे. बॅंकेच्या महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात एकूण 29 शाखा असून पुणे, पिंपरी चिंचवड, सातारा, सांगली, कोल्हापूर, वाशी, पंढरपूर आणि सोलापूर शहरातील शाखांचा यामध्ये समावेश आहे.