– शर्मिला जगताप
“अनामिका’ पाहताना प्रथम गूढकथा वाटणारी “अनामिका’ उत्तरार्धात चक्क अस्सल हिंदी फिल्मी कथा, मारामारी, कॅबेरे डान्स युक्त आहे. “अनामिका’च्या कथेत थोडसे वेगळेपण आहे. चित्रपटाला नायक लेखक असणे हीसुद्धा एक जरा दुर्मिळ गोष्ट, यापूर्वी “अनुपमा’ने तेवढे हे धाडस केले होते.
अर्थात, लेखक म्हणून संजीवकुमार धर्मेंद्रपेक्षा कितीतरी पट अधिक सरस ठरतो. तो लेखक दिसतो आणि जाणवतोही, आता “अनामिका’ने एवढा गूढ तलाश त्याच्या मागे लावून दिला आहे, की पुस्तक लिहायला चित्रपटभर त्याला सवडच मिळत नाही.
तर असा हा देवेंद्र-लेखक, संवेदनशील स्वभावाचा’ एकदा प्रेमात ठोकर खाल्ली म्हणून समस्त स्त्री जातीबद्दल तिटकारा बाळगणारा. पण अक्षरशः एका अपघाताने ही अनामिका अगदी वादळासारखी त्याच्या आयुष्यात घुसून उलथापालथ करते. “आपण त्याची पत्नी आहोत’ असे सांगून ती त्याला “शॉर्ट ट्रीटमेंट’ देते.
त्यामुळे म्हणा किंवा सिमल्याच्या सुंदर परिसरातल्या निकट सान्निध्यामुळे म्हणा, देवेंद्रमधला कठोर पुरुष वितळतो. अनामिकेवर प्रेम करू लागतो. पण सिमल्यात एक अजब प्रकार घडतो. “मिसेस मल्होत्रा’ या नावाखाली निघालेले अनामिकेचे फोटो देवेंद्रच्या हातात येतात. पुन्हा एकदा अनामिकेबद्दल संशयाचे सावट त्याच्या मनात निर्माण होते.
पुन्हा हा दिल्लीला जातो. तर अनामिकाबाई तिथे श्रीमती कश्यप म्हणून, समारंभाची यजमानीणबाई म्हणून हजर! इथून मग गैरसमज-निराकरण आणि रहस्याची उकल होते. पहिल्यापासून अखेरपर्यंत हा चित्रपट प्रेक्षकाला गुंतवून ठेवतो.
जया भादुरी हिचा मुख्य भूमिकेतील अभिनयही प्रेक्षकांच्या लक्षात राहतो. अनामिका, कांचन आणि अर्चना या वेगवेगळ्या भूमिकेत जया भादुरीचा कसदार अभिनय पाहावयास मिळतो. याचबरोबर स्त्रीच्या वेगवेगळ्या भाव-भावनाही पाहायला मिळतात.
कारण अर्चना या भूमिकेत जया भादुरी गृहिणीच्या रूपात आहे, तर कांचन या भूमिकेत जया भादुरी अनामिकाच्या रूपात दिसते. पाच-सहा दशकांपूर्वीचे स्त्रीचे हे रूप आजही पाहावयास मिळते.
आणखी विशेष म्हणजे यातील कॅबेरे नृत्य हेलनचे असल्यामुळे ते सस्ते झालेले नाही हे एक. “इन्तकाम’ नंतर हेलनचे आकर्षक नृत्य बऱ्याच काळाने नजरेस पडते. या चित्रपटातील गाणी मात्र सदाबहार आहेत.
किशोरकुमारांच्या आवाजातील “मेरी भीगी भीगी सी’, आशा भोसलेच्या आवाजातील “आज की रात’, तर लता मंगेशकर यांच्या आवाजातील “बाहों में चले आओ’ ही गाणी सहज आपल्या ओठांवर चालीसहीत गुणगुणली जातात.
======================