Gold-Silver Price Today : आज पुन्हा स्वस्त झालं सोनं; जाणून घ्या 10 ग्रामचा दर

नवी दिल्ली – जागतिक व्यापाराचे परिस्थिती सुधारत असल्यामुळे जागतिक बाजारात सोन्याचे दर कमी होत आहेत. त्याचा परिणाम भारतातही होत असून गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घट होत आहे.

गुरुवारीही दिल्ली सराफात सोन्याचे दर कमी झाल्याचे दिसून आले. गुरुवारी दिल्ली सराफ सोन्याचे दर 320 रुपयांनी कमी होऊन 45,867 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. मात्र चांदीच्या दरात 28 रुपयांची वाढ होऊन चांदीचा दर 68,283 रुपये प्रति किलो झाला.

जागतिक बाजारात सोन्याचे दर 1,780 डॉलर प्रती औंस तर चांदीचे दर 27.16 डॉलर प्रती औंस झाले. एचडीएफसी सिक्‍युरिटीजचे वरिष्ठ विश्‍लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, एकूणच आर्थिक परिस्थिती सुधारत असल्यामुळे सोन्यातील गुंतवणूक इतरत्र वळू लागली आहे. आता सोने 8 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आहे.

मात्र आगामी काळात सोन्याचे दर कमी अधिक प्रमाणात वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सोन्याचे दर 50 हजार रुपयापेक्षा कमी पातळीवर असल्यानंतर दीर्घ पल्ल्याचा विचार करून खरेदी करणाऱ्यासाठी व्यवहार फायदेशीर राहील, असे बऱ्याच विश्‍लेषकांना वाटते.

भारतात सोन्याचे दर आता विक्रमी पातळीवरून 9,800 रुपयांनी कमी झाले आहेत. अर्थसंकल्पामध्ये सरकारने सोन्यावरील आयात शुल्क कमी केल्यामुळेही सोन्याच्या दरावर परिणाम झालेला आहे. त्यामुळे आता सोन्याचे दर जून 2020 च्या पातळीवर आहेत.

एक्‍सचेंज ट्रेडेड फंडातूनही सोन्यातील गुंतवणूक काढून घेतली जात असल्याने दिसून येते. अमेरिकेसह विविध देशांच्या सरकारच्या रोख्यावरील परतावा वाढत असल्यामुळे सोन्याच्या दरावर परिणाम होत आह.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.