नवी दिल्ली -जागतिक चलन बाजारात डॉलर कमकुवत होत असल्यामुळे सोने आणि चांदीच्या दरात घट नोंदली जात आहे. भारतीय बाजारातही त्या प्रमाणात सोने आणि चांदीच्या दरात घट होत असल्याचे वातावरण आहे.
दिल्ली सराफात सोन्याचा दर 73 रुपयांनी कमी होऊन 47,319 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदीचा दर 196 रुपयानी कमी होऊन 68,043 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
याबाबत बोलतांना एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, वाढणारी महागाई आणि करोनाचे रुग्ण या कारणामुळे जागतिक बाजारात अस्थिरता आहे.
त्यामुळे डॉलर कमकुवत होत आहे. परिणामी काही गुंतवणूकदार सोन्याचा आधार घेत असल्याचे वातावरण आहे. जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,823 डॉलर तर चांदीचा दर 26.13 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला.
आगामी काळामध्ये भारतामध्ये बरेच सण येणार आहेत. त्यामुळे भारतामध्ये सोन्याची खरेदी वाढण्याची शक्यता आहे.