मुंबई – मुंबईतीत कथित कोविड घोटाळ्या प्रकरणात लाच स्वरूपात चक्क सोन्याची बिस्किट आणि नाणे देण्यात आली आहे, असा दावा अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने केला आहे. जुलै 2020 ते फेब्रुवारी 2022 या काळात 32.44 कोटी रुपयांची अनियमितता आढळून आल्याचेही आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.
विशेष न्यायालयाच्या न्या. एम. जी. देशपांडे यांच्याकडे हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ईडीने 15 सप्टेंबर रोजी लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे भागीदार सुजीत पाटकरांसह हेमंत गुप्ता, संजय शाह आणि राजीव साळुंखे यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रात मुंबई महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. किशोर बिसुरे, डॉ. अरविंद सिंग, दहिसर जंम्बो कोविड सेंटरचे डीन यांचाही समावेश आहे.
ईडीने आरोपपत्रात सांगितल्यानुसार, संजय शाह यांनी 60 लाख रुपयांची सोन्याची बिस्किटं आणि बार खरेदी केले. हे सुजित पाटकर यांच्यामार्फत महापालिका अधिकारी आणि अन्य व्यक्तींना लाचेच्या स्वरूपात देण्यात आले. तसेच, सुजित पाटकरांनी 15 लाख रुपयांची रक्कम महापालिका कर्मचाऱ्यांना दिली.
जुलै ते डिसेंबर 2020 या दरम्यान दहिसर कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या डॉ. किशोर बिसुरे यांना लॅपटॉपसह 20 लाख रुपयांची रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू मिळाल्याचेही ईडीने आरोपपत्रात सांगितले आहे.