ज्ञानेश्वर पादुका चौकापर्यंत वाहतुकीस पोलिसांचा “ग्रीन सिग्नल’ ः गैरसोय टळणार
पुणे : मागील अनेक वर्षांपासून एकेरी वाहतूक असणाऱ्या फर्गसन महाविद्यालय रस्त्यावर आता दुहेरी वाहतुकीला वाहतूक शाखेकडून “ग्रीन सिग्नल’ मिळाला आहे. वीर चापेकर चौक ते ज्ञानेश्वर पादुका चौक हा टप्पा दुहेरी वाहतुकीसाठी खुला केला आहे. वाहतूक शाखेचे अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.
शिवाजीनगर वाहतूक विभागांतर्गत वाहतूक मार्गात बदल करण्यात येणार आहेत. फर्गसन महाविद्यालय रस्त्यावरील हॉटेल ललितमहल ते ज्ञानेश्वर पादुका चौकापर्यंत डाव्या बाजूने एकेरी वाहतूक सुरू केली असून, याबाबत 2008 अन्वये अधिसूचना जारी केली होती. त्यानुसार वीर चापेकर चौकाकडून ललितमहल हॉटेलकडे जाण्यासाठी प्रवेश बंद करण्यात आला होता.
शिवाजीनगर विभागातील न.ता.वाडी, पाटील इस्टेट, मॉडेल कॉलनी परिसरातील आणि विद्यापीठ रस्त्याने फर्गसन कॉलेज रस्त्याकडे जाण्यासाठी नागरिकांना प्रवेश बंद केल्याने नागरिकांना संचेती, स. गो. बर्वे चौकाला वळसा घालून जावे लागत होते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. याबाबत शिवाजीनगर वाहतूक विभागाने दिलेल्या प्रस्तावानुसार दि.27 फेब्रुवारी रोजी डॉ. शिंदे यांनी यांनी आदेश दिले. एकेरी वाहतुकीची अधिसूचना रद्द करून वीर चापेकर चौक ते ज्ञानेश्वर पादुका चौक हा रस्ता दुहेरी वाहतुकीसाठी प्रायोगिक तत्त्वावर खुला करण्यात आला आहे.
दि.27 फेब्रुवारी ते 12 मार्च या कालावधीत काही सूचना असल्यास वाहतूक विभागाच्या येरवडा येथील कार्यालयात पाठवण्याचे आवाहन केले असून, यानंतर अंतिम आदेश काढण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली.
अपघाताचा धोका होणार कमी
वीर चापेकर चौकाकडून ज्ञानेश्वर पादुका चौकाकडे विरुद्ध दिशेने येणाऱ्या बेदकारपणे वाहनांची संख्या अधिक होती. त्यामुळे या मार्गावर अपघात होण्याचा अधिक धोका होता. यासह अनेक वाहनचालकांकडून वाहतूक पोलिसांकडे दुर्लक्ष करत या मार्गाचा “शॉर्टकट’ म्हणून वापर करण्यात येत होता. या मार्गावर प्रवास करणाऱ्या बेशिस्तांमुळे नियमांचे पालन करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत होते. या निर्णयामुळे किमान अपघाताचा धोका कमी होण्यास मदत होणार आहे.