हिंजवडी – राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धात मुळशीचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोचविणारी मुळशीची सुवर्णकन्या जलतरणपटू गीता महेश मालुसरे हिने आणखी एक अनोखा विक्रम केला आहे. रविवारी (दि. 20) दुपारी दोन वाजता मुंबईतील कुलाबा येथील प्रॉग्स लाइट हाऊस ते बेलापूर जेट्टी हे 32 किलोमीटरचे अंतर 6 तास 26 मिनिटांत पोहून पूर्ण केले.
मुळशीच्या सुवर्णकन्येचे कौतुक
तिने केलेल्या या कामगिरीबद्दल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे व डॉ. अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर ट्विट करत तिच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. सुळे यांनी गीताच्या वडिलांना फोन करून गीताचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात महिला सबलीकरणाचा संदेश देण्यासाठी गीताने ही मोहीम समर्पित केली असल्याचे तिने सांगितले. मुळशीतील मूळची मालेगावातील कन्या असलेली गीताने पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात कला शाखेतून सध्या बारावीची परीक्षा दिली आहे. रविवारी तिने सकाळी आठ वाजता प्रॉग्स लाइट हाऊसजवळ समुद्रात उडी घेतली आणि पोहायला सुरुवात केली. दुपारी 2.30 वाजता बेलापूर जेट्टीजवळ पोहत 32 किलोमीटरचे अंतर अगदी सहज पार केले. ढगाळ वातावरणात समुद्रात उसळत असलेल्या लाटांना गीता धाडसाने सामोरी गेली आणि ही मोहीम यशस्वी करून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाला “सशक्त महिला, सशक्त भारत’ हा संदेश गीताने समस्त देशवासीयांना दिला आहे.
भारतातील मुली या क्षेत्रातही सक्षम आहेत हे गीताने या मोहिमेतून दाखवून दिले आहे. तनिष कुडले या सहकाऱ्याने काही वेळ तिला प्रोत्साहन देण्यासाठी स्वीमिंग केले. स्वीमिंग फेडरेशन शार्क अक्वाटीक क्लब या संस्थेने या मोहिमेचे आयोजन केले होते. निलेश मकवाणा यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या मोहिमेत गीताची आजी शैलाबाई, वडील महेश आणि आई दीपा मालुसरे तिची कसरत पाहण्यासाठी उपस्थित होते.
13 व्या वर्षीही केला होता विक्रम
गीताने यापूर्वी तिच्या 13 व्या वाढदिवसाला 2017 मध्ये मुंबईच्या याच समुद्रात 32 किलोमीटर अंतर पोहून पूर्ण केले होते. करोनामुळे गेले दोन वर्षे गीताचा पोहण्याचा सराव पूर्ण बंद होता. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांत पुन्हा कसून सराव करत समुद्रभरारी घेतली. राष्ट्रीय कोच शेखर खासनीस यांनी या मोहिमेसाठी गीताला मार्गदर्शन केले. त्याबरोबर हर्षद इनामदार हे प्रशिक्षकदेखील या मोहिमेत सहभागी झाले होते.