राजगुरूनगर – राजगुरूनगर येथे प्रेयसीने प्रियकराच्या पत्नीचा खुन केल्याचा गुन्हा खेड पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी दोन दिवसात उघड केला. कोमल गणेश केदारी (वय २८ रा. साई साम्राज्य राजगुरूनगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून मयताच्या पतीची प्रेयसी स्वाती सुभाष रेंगडे (वय २१ वर्षे सध्या रा. शेवंता पार्क सोसायटी, तिन्हेवाडी रोड, खेड ता.खेड जि.पुणे, मुळ रा. गोद्रे ता. जुन्नर जि.पुणे) हिस खेड पोलिसांनी अटक केली आहे. तिला (दि.२४) तारखेपर्यंत पोलिस कोठडी ठेवण्याचे आदेश खेड न्यायालयाने दिले आहेत.
याबाबत खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजयसिंह चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि १६) रोजी मयत कोमल गणेश केदारी हीचा पती कंपनीत कामाला गेल्यावर घरात ती एकटी होती. कोमल हीचा अज्ञात व्यक्तीने गळा आवळून खुन झाल्याबाबत मयताचे पती गणेश केदारी यांनी खेड पोलिस ठाण्यात खबर दिली होती. खेड पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या गुन्हाचा वेगात तपास सुरू केला होता. कोणताही पुरावा नसताना खून कोणी केला? का केला? कोणत्या कारणाने केला? याबाबत पोलीसांपुढे मोठे आव्हान होते. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, अप्पर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे,उप विभागीय पोलीस अधिकारी खेड विभागचे सुदर्शन पाटील, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, खेडचे पोलीस निरिक्षक विजयसिंह चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा छडा लावण्यात आला.
खेड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विजयसिंह चौहाण, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, खेडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड, खेड पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेचे शंकर भवारी, कैलास कड, संतोष घोलप, संतोष मोरे, सचिन जतकर, प्रविण गेंगजे,अभिजीत सावंत, विक्रम तापकीर, राजू मोमीन, निलेश सुपेकर, दगडु विरकर,कैलास कड, निलम वारे यांच्या पथकाने संयुक्त तपास करून या गुन्ह्याची उकल केली.
या गुन्हयातील संशयीत महिला स्वाती सुभाष रेंगडे (वय २१ वर्षे सध्या रा. शेवंता पार्क सोसायटी, तिन्हेवाडी रोड, खेड ता.खेड जि.पुणे मुळ रा. गोद्रे ता. जुन्नर जि.पुणे) हिस जुन्नर येथून मोबाईल लोकेशन व मोबाईल वरील मेसेज, फोन याच्या माध्यमातून तपास करून ताब्यात घेतले. या गुन्हयाचे अनुशंगाने विचारपुस केली असता तिने पहिल्यांदा उडवीउडवीची उत्तरे दिली. अधिक विश्वासात घेवुन विचारपुस केली असता तिने गुन्हा केल्याची कबुली दिली. गुन्हयाचा उलगडा करून स्वाती सुभाष रेंगडे हिनेच गळा आवळुन खुन केला असल्याचे निष्पन्न करून स्वतीस पोलिसांनी अटक केले. अधिक तपास पोलीस निरीक्षक विजयसिंह चौहान करीत आहेत.