चारा छावण्यांची रखडलेली बिले त्वरित मिळावीत : रणजित देशमुख

पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना निवेदन
वडूज (प्रतिनिधी) –
सातारा जिल्ह्यातील चारा छावण्यांवरील थकीत बिल देण्याबाबत कोणतीही तक्रार नसताना जाणीवपूर्वंक प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. थकीत बिले त्वरित मिळण्याबाबतचे निवेदन चारा छावणीचालकांसोबत रणजितसिंह देशमुख यांनी मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे दिले.

दुष्काळी परिस्थितीत पशुधन वाचविण्यासाठी शासन निर्णयानुसार हरणाई सहकारी सुतगिरणी येळीव (ता. खटाव) व माणदेशी प्रबोधनकार मागासवर्गीय सहकारी सुतगिरणी पिंगळी बुद्रुक (ता. माण) या दोन्ही संस्थांनी जिल्ह्यातील एकूण चाराछावण्यांपैकी 50 टक्के चारा छावण्या चालविल्या आहेत. छावणीचालकांना प्रत्येक जनांवरासाठी 115 ते 120 रुपये खर्च आला आहे. परंतु, शासनाकडून फक्त 100 रुपये अनुदान मंजूर आहे. या छावण्या बंद होऊन आठ महिने झाले असले तरी अजून दोन महिन्यांचे अनुदान मिळालेले नाही. तसेच एकूण अनुदानातील 60 टक्के रक्कम राखून ठेवलेली आहे.
म्हणजेच शासनाकडून दोन महिन्यांचे अनुदान व 7 टक्के राखून ठेवलेली रक्कम येणे बाकी आहे. अनुदान मिळत नसल्यामुळे चारा उत्पादक शेतकरी, पशुखाद्य व छावणीतील खर्च यांची देणी भागविण्यासाठी सर्व छावणीचालकांनी भरमसाठ व्याजाने खासगी सावकाराकडून पैसे घेतले असल्याने छावणीचालक कर्जबाजारी झाले आहेत.

कर्जबाजारीपणामुळे छावणीचालकांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. तरी शासनांकडून रखडलेले अनुदान व कमी पडलेले अनुदान तातडीने मिळावे, अशी मागणी निवेदनाद्वारे देशमुख यांनी केली आहे. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष मामूशेठ विरकर, युवक नेते मृणाल पाटील, विक्रमादित्य रणजितसिंह देशमुख, नीलेश देशमुख आदी सहसंस्था चारा छावणीचालक उपस्थित होते. दरम्यान चारा छावणीच्या रखडलेल्या बिलाबाबत लवकरच मार्ग काढण्याचे आश्‍वासन वडेट्टीवार यांनी यावेळी दिले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.