नवी दिल्ली – लुधियानामध्ये अलिकडेच झालेल्या बॉम्बस्फोटाशी संबंधित एका व्यक्तीला जर्मनीमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. भारतीय गुप्तचरांनी दिलेल्या माहितीच्या आधारे जर्मनीतील अधिकाऱ्यांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. लुधियानातील बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा संशय असलेल्या “सिख फॉर जस्टीस’ या संघटनेचा हा हस्तक असून त्याचे नाव जसविंदरसिंग मुलतानी आहे. भारतात दहशतवादी हल्ला घडवण्याच्या प्रयत्नांमध्ये त्याचा सक्रिय सहभाग असल्याबाबतची गोपनीय माहिती देण्यात आल्यानंतर त्याला तेथील अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.
मुलतानीविरोधात पंजाबमध्ये दोन एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. त्याला ताब्यात घेतल्यानंतर भारतीय अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याची चौकशी केली जात आहे.
लुधियानातील न्यायालयाच्या आवारात 23 डिसेंबर रोजी बॉम्बस्फोट झाला होता. त्यामध्ये गगनदीप हा बडतर्फ पोलीस कर्मचारी ठार झाला होता. बॉम्ब ठेवत असतानाच या बॉम्बचा स्फोट झाला होता. या स्फोटात अन्य दोघेजण जखमी झाले होते. पाकिस्तानातून पंजाबमध्ये खलिस्तानी नेत्यांच्या माध्यमातून कट्टरवाद पसरवण्याचा प्रयत्न पाकिस्तानातून केला जात असल्याच्या शक्यतेच्या आधारे या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना शेतकरी नेते बलबीर सिंग राजेवाल यांच्या हत्येची योजना केल्याप्रकरणीही मुलतानीचे नाव तपासात पुढे आले होते. राजेवाल यांच्यासह बलदेवसिंग सिरसा, कुलदीप संधू आणि जगजीत सिंग या शेतकरी नेत्यांच्या हत्येचा कट केल्याबद्दल हरियाणा पोलिसांनी सोनिपत येथून योगेश नावाच्या व्यक्तीला जानेवारीत अटक केली होती. आपण मुलतानीच्या संपर्कात असल्याचे आणि काही शेतकरी नेत्यांना मारण्याचे काम आपल्याला दिले गेले असल्याचे योगेशने पोलिसांना सांगितले होते.
लुधियाना बॉम्बस्फोटानंतर या स्फोटाचा सूत्रधार पाकिस्तान आणि आखाती देशांमधील खलिस्तानी नेत्यांच्या संपर्कात असल्याचे तपासादरम्यान उघड झाले होते. स्फोटात ठार झालेला पोलीस कर्मचारी गगनदीप हा मुलतानीच्या संपर्कात होता आणि मुलतानीनेच स्फोटासाठीची स्फोटके उपलब्ध करून दिल्याची माहितीही तपासादरम्यान उघड झाली होती. पंजाब आणि देशात अन्यत्र अशाच प्रकारचे स्फोट घडवून आणण्याचा कट रचला गेला होता, असे मेसेंजर या सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेल्या संदेशांच्या देवाणघेवाणीतून उघड झाले आहे.