मुंबई – अमेरिकेतील हिंडेनबर्ग संशोधन या संस्थेने केलेल्या आरोपाला गौतम आदानी यांच्या समूहाने 413 पानी पत्र पाठवून या आरोपाचा इन्कार केला आहे. मात्र तरीही सोमवारी या समूहातील बहुतांश कंपन्यांच्या शेअरच्या भावात बरीच घट झाली. गेल्या तीन कामकाजाच्या दिवसात शेअर विक्रीमुळे अदानी समूहातील कंपन्यांचे 5.56 लाख कोटी (72 अब्ज डॉलर) रुपयाचे नुकसान झाले आहे.
गेल्या तीन दिवसांमध्ये अदानी ट्रान्समिशनचा शेअर 41 टक्क्यांनी, अदानी टोटल गॅसचा शेअर 40 टक्क्यांनी, अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर 38 टक्क्यांनी, अंबुजा सिमेंटचा शेअर 23 टक्क्यांनी, एसएससी चा शेअर 23 टक्क्यांनी, अदानी एंटरप्राईजेसचा शेअर 20 टक्क्यांनी, अदानी विल्मारचा शेअर 15 टक्क्यांनी, अदानी पावरचा शेअर 15 टक्क्याने तर एनडीटीव्हीचा शेअर 15 टक्क्यांनी घसरला आहे.
आज इतर कंपन्यांच्या शेअरच्या भावात घसरण झाली असली तरी अदानी एंटरप्राईजेसचा शेअर 4.21 टक्क्यांनी, अंबुजा सिमेंटचा शेअर 1.65 टक्क्यांनी व एसीसी कंपनीचा शेअर 1.10 टक्क्यांनी वाढला.
शेअर निर्देशांकांत सुधारणा –
अदानी समूहाबाबत वरातग्रस्तता निर्माण झाल्यामुळे शेअर बाजारामध्ये कमालीची अस्थिरता होती. अशा परिस्थितीत माहिती तंत्रज्ञान आणि तेल व नैसर्गिक वायू क्षेत्राचे निर्देशांक वाढल्यामुळे मंगळवारी शेअर बाजार निर्देशांक सुधारणा झाली. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 169 अंकांनी वाढून 59,500 अंकावर बंद झाला.
विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 44 अंकांनी वाढून 17,648 अंकावर बंद झाला. या आठवड्यात अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्याचबरोबर अमेरिकेचे पद धोरण जाहीर होणार आहे. त्याकडे गुंतवणूकदाराचे लक्ष आहे. परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतातून विक्री करीत असून शुक्रवारी या गुंतवणूकदारांनी 5,977 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली.