Women’s Sindhi Premier League 2024 : सुलतान्स ऑफ सिंधने हेमू कलानी ग्लॅडिएटर्सचा 10 गडी राखून पराभव करत पाचव्या सिंधी प्रीमिअर लीगचे विजेतेपद पटकविले. अष्टपैलू कामगिरी करणारा धीरज मनवानी सामनावीर ठरला. पिंपरीतील मृणाल क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा झाली.
सिंधी प्रीमिअर लीगमध्ये यंदा पहिल्यांदाच महिलांची स्पर्धा
दुसरीकडे सिंधी प्रीमिअर लीगमध्ये यंदा पहिल्यांदाच महिलांची स्पर्धा घेण्यात आली. सहा संघांचा यात समावेश होता. गंगा वॉरियर्स आणि झेलम क्वीन्स यांच्यात अंतिम सामना रंगला. गंगा वॉरियर्सने कर्णधार शीतल आसवानीच्या धडाकेबाज 34 चेंडूतील 95 धावांची खेळी व चार धावांत 3 गडी बाद करत केलेली भेदक गोलंदाजी याच्या जोरावर झेलम क्वीन्सवर 48 धावांनी विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करत वॉरियर्सने 8 षटकांत 4 बाद 114 धावा केल्या. 115 धावांचे तगडे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या झेलम क्वीन्सने चांगली सुरुवात केली. मात्र, सलामीवीर अंजली आसवानी (12) जायबंदी झाल्याने, तसेच नेहा (18) व याकृत (24) फटके मारण्याच्या नादात लवकर बाद झाल्याने त्यांचा डाव गडगडला. अन्य फलंदाज अपयशी ठरल्याने 7.4 षटकांत अवघ्या 66 धावांत झेलम क्वीन्सचा डाव संपुष्टात आला. शीतल आसवानीला सामनावीराचा किताब मिळाला.
संक्षिप्त धावफलक
गंगा वॉरियर्स – 8 षटकांत 4 बाद 114 (शीतल आसवानी 95, नेहा 15-2) विजयी विरूध्द झेलम क्वीन्स : 7.4 षटकांत सर्वबाद 66 (याकृत 24, नेहा 14, अंजली आसवानी 12, शीतल आसवानी 4-3, सम्या 5-2)