फलटण – सोनवडी (ता. फलटण) येथे दि. 19 जून रोजी रात्री कोळसा खाण मालक व इतर चौघांनी एका आदिवासी मजूर महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेतील आरोपींविरुद्ध 376, 376 ड, अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम व वेठबिगार कायद्यांतर्गत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील हे मजूर फलटण येथील सोनवडी येथे मजुरीसाठी आले होते. मौजे सोनवडी बुद्रूक गावाच्या हद्दीत हसन लतीफ शेख याने फिर्यादी आदिवासी महिलेच्या पतीला दहा हजार रुपये देऊन कामाकरिता ठेवून घेतले होते व फिर्यादीची मुले स्वतःजवळ ठेवून, फिर्यादी महिलेच्या पतीला कामाला लावून हसन लतीफ शेख व इतर अनोळखी चार इसमांनी दि. 19 जून रोजी रात्री आठ ते पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान, सोनवडी बुद्रूक गावाच्या हद्दीत हसन लतीफ शेख याच्या शेतामधील खोपीमध्ये फिर्यादी आदिवासी महिलेच्या इच्छेविरुद्ध वारंवार जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवून, तू कोणास काही सांगितले तर तुला व तुझ्या मुलाला जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली.
पीडित महिलेवर अत्याचार झाल्यानंतर हे कुटुंब पंढरपूर व त्यानंतर आपल्या रायगड जिल्ह्यातील मूळ गावी गेले. मीरा भाईंदर पोलीस स्टेशनमधून मदत मिळाल्यानंतर व आदिवासी समाजासाठी सामाजिक काम करणाऱ्या संस्थेच्या मदतीने पीडित आदिवासी महिला व त्यांच्या कुटुंबियांना फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात आणून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फलटण ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्या ठिकाणाहून अन्य दोन मजुरांची व पिडीत महिलेची दोन लहान मुले, सासू सासरे अशा चौघांची सुटका करून त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपअधीक्षक राहुल धस करत आहेत.