नवी दिल्ली – भारतीय राजकारणात क्रीडा क्षेत्रातील तेही क्रिकेटपटूंना संधी देण्याचा जणू ट्रेंडच आला आहे. याआधी भारतीय जनता पक्षाने माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याला लोकसभेत पाठवलं. तर तृणमूल काँग्रेसने क्रिकेटपटू मनोज तिवारीकडे थेट राज्याचं क्रीडा मंत्रालय सोपवलं. आता आम आदमी पक्षाने माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग याला राज्यसभेची उमेदावारी दिली आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने पंजाबातून माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग, आपचे दिल्लीतील आमदार राघव चढ्ढा, दिल्ली आयआयटीचे प्राध्यापक संदीप पाठक, उद्योगपती संजीव अरोरा आणि शिक्षणतज्ज्ञ अशोक कुमार मित्तल यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे.
आम आदमी पक्षाकडे पंजाबातील 117 जागांपैकी 92 आमदार असल्याने त्यांचे हे पाचही उमेदवार निवडून येण्याची खात्री बाळगली जात आहे. पंजाबमधील राज्यसभेचे पाच खासदार – सुखदेव सिंग धिंडसा (शिरोमणी अकाली दल), प्रताप सिंग बाजवा (कॉंग्रेस), श्वेत मलिक (भाजप), नरेश गुजराल (एसएडी) आणि शमशेर सिंग दुल्लो (कॉंग्रेस) यांचा कार्यकाळ एप्रिल मध्ये संपणार आहे. त्यांच्या जागांवर ही निवडणूक होणार आहे.
पंजाबातील निवडणुका एकतर्फी बहुमताने जिंकल्यानंतर आम आदमी पक्षाला राज्यसभेच्या या पाच जागांची लॉटरीच लागली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 24 मार्च ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे.तिथे 31 मार्चला निवडणूक होणार आहे. त्याच दिवशी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले, जाणार आहेत.