गडचिरोली: राज्यात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात करोनाने शिरकाव केला आहे; परंतु गेली दोन महिने करोनापासून दूर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातही करोनाबाधित आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. गडचिरोलीत तीन ठिकाणी संस्थात्मक क्वारंटाइनमधील 3 जणांचे नमुने हे पॉझिटिव्ह आले आहेत.
लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्पात अटी शिथिल करण्यात आल्या आहे. यामुळे राज्यात आणि जिल्ह्यात अडकलेल्या लोकांना आपल्या गावी जाण्यास मुभा मिळाली; परंतु जी लोकं गावी परतली आहे. प्रवास करून गावी पोहोचलेल्या लोकांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
ग्रीन झोन असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातही काही नागरिक हे बाहेरून आले होते. खबरदारी म्हणून प्रशासनाने या लोकांना संस्थात्मक क्वारंटाइन केले होते. त्यानंतर त्याचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवले होते. आज क्वारंटाइन केलेल्या तीन जणांचा कोविड- 19 चा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले.
यामध्ये कुरखेडा येथील वेगवेगळ्या दोन क्वारंटाइन सेंटरचा व चामोशीमधील एका क्वारंटाइन सेंटरचा समावेश आहे. संबंधित करोनाबाधित व्यक्तींना जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण वॉर्डमध्ये हलविण्यात आले आहे. संबंधित रुग्णांकडून त्यांच्या प्रवासाची तपशील घेणे सुरू आहे. संबंधित पॉझिटिव्ह आलेल्या प्रवाशांना आरोग्य विभागाकडून 16 मे रोजी जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात आले होते. राज्यातला सध्या ग्रीन झोन असलेला गडचिरोली एकमेव जिल्हा होता; परंतु आता करोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे ग्रीन झोनच्या वर्गवारीतून जिल्हा बाहेर पडला आहे.