फुरसुंगी, दि. 27 (प्रतिनिधी) – हडपसर-सासवड मार्गावर उड्डाणपुलावरील रस्त्यावर सर्वत्र खड्डेच खड्डे पडले आहेत. राष्ट्रीय महामार्ग दुरुस्तीची जबाबदारी प्राधिकरणाची असताना याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
हडपसर-सासवड मार्गावरील फुरसुंगी रेल्वे उड्डाणपुलावरील रस्त्यांची दुरुस्ती गेल्या काही वर्षांपासून रखडली आहे. हा रस्ता कोठेही समतल राहिलेला नाही अनेक ठिकाणी डांबर उखडले आहे. या रस्त्यावर दररोज अहोरात्र हजारो अवजड वाहने, ट्रक ये-जा करत असतात, त्यामुळे सर्व रस्त्यात खड्डे पडले आहेत. रस्ता पूर्णपणे उखडून खडी, दगडगोटेवर आल्याने अवजड वाहनांच्या टायरखालून दगड उडत असल्याने पुलावरून जाणाऱ्या इतर वाहनांवर ते उडत आहेत.
काही वेळा दुचाकीस्वार अशा घटनेतून जखमी झाले आहेत. खड्ड्यांमुळे या रस्त्यावरील वाहतुकीचा वेगही मंदावला आहे. पुलाच्या बाजूचे दोन्ही रस्त्यांचे डांबरीकरण तातडीने करावे, अशी मागणी होत आहे.