मुंबई/श्रीनिवास वारुंजीकर: करोना व्याधीमुळे सारेच हवालदिल झालेले असताना, आता संवेदनशील कलाकारही हिरीरीने पुढे येऊ लागले आहेत. मूळचे साताऱ्याचे असलेले राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यक्तिचित्रांसाठी प्रसिद्ध असलेले, सध्या मुंबई येथे स्थायिक असलेले चित्रकार प्रमोद कुर्लेकर यांनी एक अभिनव योजना जाहीर केली आहे. त्यानुसार कोणाही व्यक्तीने पंतप्रधान केअर किंवा मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देणगी दिल्याचे दाखवायचे आणि आपले व्यक्तिचित्र मोफत घेऊन जायचे, अशी ही योजना आहे.
किमान एक हजार रुपयांची मदत करणाऱ्यास चारकोल पेंटिंगमधले (ब्लॅक-व्हाईट) आणि 25 हजार किंवा त्यापेक्षा जास्त मदत पाठवणाऱ्यास त्या व्यक्तीचे रंगीत व्यक्तिचित्र कुर्लेकर करून देत असून त्याला असंख्य नामांकितांचाही प्रतिसाद मिळतो आहे. या उपक्रमाला कुर्लेकर यांनी “आर्ट फॉर सोसायटी’ असे नाव दिले असून या उपक्रमांतर्गत मागील काही महिन्यात साडे तीन लाखांहून अधिक रकमेची मदत सरकारकडे जमा झाली असून हा उपक्रम येत्या 3 मे पर्यंत चालू राहणार आहे, असे कुर्लेकर यांनी सांगितले.
सातारा-मेढा रस्त्यावरील नुने या छोट्याशा गावातील कुर्लेकर यांचे कलाविषयक शिक्षण सांगलीच्या कलाविश्व महाविद्यालय आणि उच्च शिक्षण सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथे झाले आहे. व्यक्तिचित्रणात प्रचंड कौशल्य हस्तगत केलेल्या कुर्लेकर यांनी अनेक सेलिब्रिटीजची व्यक्तीचित्रे साकारली आहेत. स्वत:चा स्टुडिओच्या माध्यमातून ते अनेक कलाकारांना घडवतही असतात.
मार्च महिन्यापासून करोनाविषाणूचे वारे वाहू लागले आणि सर्वच जनजीवन ठप्प झाले. त्यामुळे अनेकांची आर्थिक कोंडीही झाली. म्हणून केंद्र सरकार व राज्य सरकारतर्फे नागरिकांना मदतीचे आवाहन करण्यात आले होते. या निधीमध्ये जास्तीतजास्त नागरिकांनी आपला सहभाग देण्याला प्रोत्साहन मिळावे, म्हणून प्रत्येक देणगीदाराला त्याचे एक व्यक्तिचित्र भेट देण्याची योजना माझ्या डोक्यात आली आणि बघता-बघता या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत गेला, असे कुर्लेकर यांनी सांगितले.