युक्रेन आणि रशियाच्या सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन दिवसातून सुमारे तीन हजार वेळा होत आहे. त्यामुळे तेथे युध्द सुरू झाले असल्याचे माणण्यात येत आहे, असे “इंडिया टुडे’च्या सीमेवरून केलेल्या वृत्तांकनात म्हटले आहे.
रशियाने आपल्या राजनैतिक कर्मचाऱ्यांना युक्रेनमधून माघारी नेण्यास सुरवात केली आहे. रशियाचे युक्रेनमध्ये किव्ह, ओडेसा आणि लव्हिव्ह येथे राजकीय दुतावास आहेत.
युक्रेनने रशियात राहणाऱ्या आपल्या नागरिकांना तातडीने स्वदेशी परतण्याचे आवाहन केले आहे. युक्रेनमध्ये आणीबाणी लादण्यात आली आहे. रशियाच्या आक्रमणाची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला.
लष्करात सेवा देणाऱ्या 18 ते 60 वर्षांमधील नागरिकांना एक वर्षाची सेवा बंधनकारक करण्याचा निर्णय युक्रेनने घेतला आहे.
आम्ही राजनैतिक तोडग्यास तयार आहोत. मात्र त्यात रशियाच्या कोणत्याही हितसंबंधाला बाधा पोहोचू देणार नाही, अशी भूमिका रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादमीर पुतीन यांनी मांडली. बायडेन आणि पुतीन यांच्या चर्चेसाठी ही वेळ योग्य नसल्याची भूमिका व्हाईट हाऊसने बुधवारी मांडली.
ऑस्ट्रेलीयाने रशियावर निर्बंध लादले आहेत. युरोपीय राष्ट्रे आणि अमेरिकेनंतर जपाननेही रीशयावर निर्बंध लादले आहेत.
युक्रेन पेचप्रसंगावरून अमेरिका भीती आणि दहशत पसरवात असल्याचा आरोप चीनने केला आहे. रशियावर आणखी निर्बंध लादण्यासही विरोध केला आहे.
रशियाच्या कृतीचे “वंडरफुल, स्मार्ट जिनियस अशा शब्दात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कौतुक केले आहे.
युक्रेनमधील बंडखोरांच्या ताब्यातील प्रदेशाला राष्ट्राचा दर्जा दिल्याने रशिया यापुढे युक्रेनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देणार नाही असे दिसत आहे, असे फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री जेनिवेस ली डीरीयन म्हणाले.
पूर्व युक्रेनमधून फौजा मागे न घेतल्यास रशियावर आणखी कठोर निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्याचा इशारा इंग्लंडने दिला आहे.
भविष्याचा भेसूर परिणाम लक्षात घेऊन युक्रेन आणि रशिया यांनी संयम बाळगावा, असे आवाहन पोप यांनी केले आहे.
भारताबरोबरचे मैत्रीचे संबंध कायम राहतील, अशी अपेक्षा रशियाच्या भारतातील राजदुतांनी व्यक्त केली आहे. आम्ही दहा वर्षांचा परस्पर सहकार्य करार केला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.