राजकारण, समाजकारण आणि व्यवसाय करताना माळरानावर रमेश माणिकराव भोसले यांनी नंदनवन फुलवले आहे. शेतकऱ्याचा मुलगा ते यशस्वी उद्योजक हा रमेश भोसले यांचा प्रवास थक्क करणारा आहे. लहान, थोरांना प्रेरणा देणारा आहे. भोसले यांच्या या यशस्वी वाटचालीचा घेतलेला आढावा…
भोसले कुटुंबियांची घरची परिस्थिती हलाखीची असल्याने प्राथमिक शिक्षण मामाच्या गावी बारामती तालुक्यातील पारवडी येथे झाले. वरवंड येथील गोपीनाथ विद्यालयात माध्यमिक शिक्षण घेत असताना बारावीच्या परीक्षेनंतर कुरकुंभ एमआयडीसी मध्ये काही दिवस एका खासगी कंपनीत काम केले. परंतु, खासगी कंपनीत पगार अतिशय तुटपुंजा होता. काम करूनही तुच्छतेची वागणूक मिळत असल्याने नोकरी न करता व्यवसाय करण्याचा निर्णय भोसले यांनी घेतला. आई-वडिल शेती करीत असल्याने शाळा शिकत त्यांना शेतकामात मदत केली.
कुसेगावातील काही लोक फुलांचा व्यवसाय करायचे त्यातून फुलांचे पैसे आणि शेतकऱ्यांना फुलांचा पगार देवुन वाहतुकीची जास्त रक्कम शिल्लक राहायची. ही रक्कम त्या काळी खूपच जास्त असल्याने व्यवसायाकडे वळण्यास हे एक महत्त्वाचे कारण ठरले. वाणिज्य शाखेतून (कॉमर्स) चौदावी मध्ये शिकत असताना ते फुलांच्या वाहतूक व्यावसायाकडे वळले. चौदावी मध्ये असतानाच त्यांनी एक गाय खरेदी केली; त्यावेळी गाय व्याल्यानंतर दूध कोठे घालायचे हा कुसेगाव मध्ये प्रश्न होता. गावामध्ये चार बाहेरचे दूध डेअरीवाले दूध गोळा करण्यासाठी यायचे. मात्र, ते दुधाचे पैसे वेळेवर देत नसायचे. ही अडचण ओळखून भोसले यांनी दूध संस्था काढण्याचा निर्णय घेतला.
भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन व्हाईस चेअरमन रमेश आप्पा थोरात यांनी दूध संस्था काढण्यासाठी सहकार्य केले आणि राजे फिरंगोजी ही दूध संस्था रमेश भोसले यांनी सुरू केली. सुरुवातीला अवघे 40 लिटर दूध संकलन होत होते, यातून संस्था चालवणे अतिशय कठीण होते.
सहकारी दूध संस्था चालवताना रमेश भोसले यांनी 2002 मध्ये राजे डेअरीज ही स्वतःच्या मालकीची दूध संस्था सुरू केली. 2002 मध्ये राजे डेअरीजचे सुरुवातीचे दूध संकलन अवघे 700 लिटर होते. परंतु, भोसले आणि त्यांचे बंधू धनंजय भोसले यांनी आपार कष्ट, मेहनत घेत दूध व्यवसायात वाढ केली. आज, 2020 मध्ये राजे डेअरीजचे दूध कलेक्शन दहा हजार लिटर केले आहे. कुसेगाव मध्ये त्यांनी लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत शेती पूरक व्यवसायासही प्रोत्साहन दिले. राजे डेअरीज दुधाबरोबरच खवा, पनीर, दही, ताक, सुगंधी दूध इत्यादी उत्पादित करते.
राजे डेअरीजच्या वाटचालीत रमेश भोसले यांना लहान बंधू धनंजय भोसले यांची मोलाची साथ मिळाली. धनंजय यांनी उरूळीकांचन येथील बी.व्ही.राव संस्थेतून पोल्ट्री फार्मिंग मध्ये डॉक्टरेट पदवी संपादन केली आहे. परंतु, मोठ्या भावाला व्यावसायात साथ देण्यासाठी त्यांनी पोल्ट्री फार्म मधील काम सोडले. मनमिळाऊ स्वभाव आणि कामाची चिकाटी असणारे धनंजय भोसले स्वतः दूध संस्थेवर सकाळी लवकर उठून जातात. सकाळी आणि संध्याकाळी स्वतः दुधाचे संकलन करण्याचे काम करतात. स्वभाव मनमिळाऊ असल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि हाच आमचा मोठा नफा, ठेव असल्याचे भोसले कुटुंबिय सांगतात.
सामाजिक सहभाग…
कुसेगाव हे जिरायती पट्ट्यातील गाव आहे. सतत पाण्याची टंचाई असणाऱ्या उजाड माळरानावर रमेश भोसले यांनी डाळिंबाची पाच एकर बाग फुलवली आहे. गावात सतत पाण्याची कमतरता असल्याने सुमारे अडीच कोटी लिटर क्षमतेचे शेततळे उभारले आहे. कुसेगाव येथील भानोबा विद्यालय येथे भोसले यांच्या माध्यमातून सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. भोसले यांच्या संघर्षात बॅंक ऑफ महाराष्ट्रने महत्त्वाची मदत केली आहे. याशिवाय एकीकडे दूध संकलन सुरू असताना दुसरीकडे सर्वसामान्यांना सावकारकीच्या जाचातून वाचवण्यासाठी रमेश भोसले यांनी कुसेगाव मध्ये राजे फिरंगोजी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था सुरू केली आहे.
राजकीय प्रवास…
दूध व्यवसायाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत असताना रमेश भोसले यांनी 2011 मध्ये कुसेगाव ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि या निवडणुकीत भरघोस मतांनी विजय मिळवत. गावचे उपसरपंच पद भूषवले व त्याच दरम्यान दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पदही भूषवले. श्रीराम विकास सोसायटी लिमिटेड कुसेगावचे सदस्य म्हणून 2015 पासून ते कार्यरत आहेत. 2016 मध्ये भोसले यांनी ग्रामपंचायत निवडणूक पुन्हा लढवली. यावेळी जिवलग मित्र मनोज फडतरे यांच्या साथीने कुसेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत स्वतःचे पॅनल उभे केले. या निवडणुकीत नऊ पैकी सहा सदस्य स्वतःच्या पॅनलचे निवडून आणले. आता, कुसेगावचे सरपंच पद रमेश भोसले भूषवित आहेत. गेले वर्षभर गावचा कारभार पाहत आहेत.