इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांची होत असलेली ससेहोलपट लक्षात घेऊन श्री नागेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलची स्थापना करण्यात आली. आजच्या युगात इंग्रजी शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हे लक्षात घेत श्री. दादासाहेब सिरसट यांनी दि. 1 मे 2007 मध्ये शेटफळगढे (ता. इंदापूर) येथे सुरू केलेले हे इंग्लिश मिडीयम स्कूल आता तालुक्याची ओळख बनले आहे.
श्री नागेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये घंटा वाजली की गावात सरस्वती नांदत असल्याचा भास होतो. आज, गावात मोठ्या दिमाखात हे स्कुल उभे असले तरी यामागे संस्थापक दादासाहेब सिरसट यांचे मोठे कष्ट आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन या संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे. सुरूवातीच्या काळात भाडेतत्त्वावर ग्रामपंचायतीच्या इमारतीमध्ये ही शाळा भरत असे, शाळेत फक्त 60 विद्यार्थी शिक्षण घेत होते. आज हिच संख्या 500च्यावर गेली आहे. 2007 मध्ये सुरु झालेल्या नागेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलच्या स्थापनेला 12 वर्ष म्हणजे एक तप पूर्ण झाले आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून संस्थेने गरुडभरारी घेतली आहे. आज, सुमारे 500 पेक्षा अधिक विद्यार्थी या शाळेतून, महाविद्यालयातून शिक्षण घेत आहेत.
श्री नागेश्वर ज्युनिअर कॉलेजची स्थापना करण्यात आली असून प्रशस्त इमारत बांधण्यात आली आहे. प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने शिक्षण दिले जात असून भौतिक सोयी, सुविधा पुरविल्या जात आहेत. सुसज्ज ग्रंथालय, प्रशस्त मैदान, प्रयोगशाळा, क्रीडा साहित्य, विविध स्पर्धा परीक्षेतून सहभाग, एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षा तसेच दहावीची 100 टक्के निकालाची परंपरा यामुळे या संस्थेने पंचक्रोशीतील गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देणारी संस्था, अशी ओळख निर्माण केली आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केले जाते तसेच क्रीडा स्पर्धा, मुलींना स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षणही दिले जाते. जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत तर विद्यालयातील पाच विद्यार्थीनींनी सहभाग घेतला होता. विद्यालयात ऍबॅकसचे प्रशिक्षणही दिले जाते. या परीक्षेत 2009 मध्ये वैभव पवार याची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली होती. याशिवाय गायन स्पर्धा, आठवडे बाजार, पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपन, रांगोळी स्पर्धा आयोजित केल्या जातात. स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी यासाठी नवोदय, इयत्ता पाचवी व आठवी स्कॉलरशीप ऑलिम्पीयाड परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला जातो.
नामांकित संस्थांकडून गौरव…
इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे सारख्या ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमातून शिक्षण उपलब्ध व्हावे, याकरीता झटणाऱ्या तसेच शिक्षणाचे व्यापारीकरण करण्यापेक्षा त्यातून ज्ञानदानाचे कार्य स्विकारणाऱ्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब सिरसट यांचा शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल देऊळगाव रसाळ येथील सेवाभावी प्रतिष्ठान यांच्यावतीने बारामती गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे. यासह जिल्ह्यातील अनेक नामांकित संस्थांकडूनही सिरसट यांचा कार्याची दखल घेत गौरव करण्यात आलेला आहे.
श्री नागेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सुमारे 500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इयत्ता दहावीची 100 टक्के निकालाची परंपरा विद्यालयाने कायम राखलेली आहे. मागील 12 वर्षाच्या कालावधीत संस्थेचा प्रगतीचा चढता आलेख राहिलेला आहे. या यशामागे माझा परिवार, सहकारी मित्र तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी किंबहुना पालकांचाही मोठा वाटा राहिला आहे. या सर्वांचा आभारी आहे. भविष्यात सुद्धा यापेक्षा जास्त प्रगती करून महाविद्यालयीन तसेच बीए पर्यंतचे शिक्षण देण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे.
– दादासाहेब सिरसट, संस्थापक अध्यक्ष,
श्री नागेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल
संकलन: निलेश चांदगुडे, शेटफळगटे