नवी दिल्ली – महिला दिनानिमीत्त उद्या 8 मार्च रोजी देशातल्या सर्व महत्वाच्या ऐतिहासिक स्थळांवर महिलांना मोफत प्रवेश देण्याचा निर्णय भारतीय पुरातत्व विभागाने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली सर्व सोशल मिडीया अकाऊंट्स रविवारी महिलांना समर्पित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर केंद्र सरकारच्या सांस्कृतीक मंत्रालयानेही हा निर्णय घेतला आहे.
महिलांचा सन्मान राखण्याच्या उद्देशाने हा निर्णय आम्ही घेतला असल्याचे सांस्कृतीक मंत्री प्रल्हाद पटेल यांनी म्हटले आहे. या निर्णयाचा अधिकाधिक महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.
देशातील सर्व महत्वाच्या ऐतिहासिक स्थळांमध्ये लहान बालकांना स्तनपान करण्यासाठी महिलांना स्वतंत्र कक्ष उभारण्याची सोय या विभागाने या आधीच केली आहे.