बीड : शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज घेतल्याप्रकरणी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते रत्नाकर गुट्टे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडच्या अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला. गंगाखेड साखर कारखान्याला करारासाठी दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करत ऊसतोड मुकादामाच्या नावावर परस्पर 12 लाख 80 हजारांचे कर्ज उचलल्याचा आरोप रत्नाकर गुट्टे यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
ऊसतोड मुकादमाने गंगाखेड साखर कारखान्यासोबत केलेल्या कराराचे बॉण्ड दिले होते. या बॉण्डचा गैरवापर करत कारखान्याने या दोन मुकादमाच्या नावाने कर्ज उचलल्याचे समोर आल्यानंतर या मुकादमाने पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणात प्रभाकर केंद्रे आणि रावण केंद्रे यांचे प्रत्येकी 12 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे पुढे आले आहे. या संदर्भात रत्नाकर गुट्टे, गंगाखेड साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आणि बॅंक ऑफ इंडिया अंबाजोगाई शाखेच्या व्यवस्थापकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.