पुलवामामधील चकमकीत जैशचे चार दहशतवादी ठार

श्रीनगर -जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना ठार केले. ते पाकिस्तानस्थित जैश-ए-महंमद संघटनेचे सदस्य होते. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये पूर्वाश्रमीच्या दोन विशेष पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

पुलवामात एका ठिकाणी दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी त्यांच्या शोधासाठी विशेष मोहीम हाती घेतली. त्या मोहिमेवेळी सुरक्षा पथक आणि दहशतवादी आमनेसामने आले. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला सुरक्षा जवानांनी प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये चकमक झडली. त्यात चार दहशतवादी मारले गेले.आशिक हुसेन गनई, इम्रान अहमद बट, मोहम्मद सलमान खान आणि शाबीर अहमद दर अशी ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत.

मोहम्मद आणि शाबीर काही दिवसांपूर्वी पोलीस दल सोडून जैशमध्ये सामील झाले. सुरक्षा दलांचे कर्मचारी दहशतवादाच्या मार्गावर गेल्याच्या काही घटना याआधीही जम्मू-काश्‍मीरात घडल्या आहेत. दरम्यान, जम्मू-काश्‍मीरातील दुसऱ्या घटनेत सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा एक अड्डा उद्धवस्त केला. दोडा जिल्ह्यात तो अड्डा होता. तिथून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.