लक्षवेधी: जगनमोहन, नवीन यांचा कित्ता कॉंग्रेस गिरवेल का?

राहुल गोखले

कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या राजीनाम्याचा विषय मागे पडला आहे आणि उलट राहुल यांनी आपले 52 खासदार भाजप सरकारला संसदेत पुरून उरतील अशी वल्गना केली आहे. अशा घोषणा ऐकण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये तत्कालिक चैतन्य उत्पन्न करण्यासाठी आकर्षक असल्या तरीही त्यांचा दीर्घकालीन परिणाम नसतो. पक्ष मजबूत ठेवायचा तर सातत्याने मेहनत घ्यावी लागते; पक्ष संघटन बांधावे लागते; कार्यकर्त्यांना कार्यक्रम द्यावा लागतो आणि मुख्य म्हणजे सक्षम नेतृत्व लागते.

राहुल गांधी यांनी निवडणुकीत “चौकीदार चोर है’ सारख्या घोषणा दिल्या; पूर्वी मोदींना उद्देशून “सूटबूट की सरकार’ सारख्या टीका करणाऱ्या घोषणा लोकप्रिय केल्या; मात्र सगळ्याचा व्हायचा तो परिणाम झाला नाही. कॉंग्रेसला गेल्या वेळेपेक्षा अगदीच जुजबी जागा जास्त मिळाल्या आणि मुख्य म्हणजे भाजपच्या जागा वाढल्या. अनेक नेत्यांचे पक्ष झाले आहेत कारण नेत्याला आपणही कार्यकर्तेच असतो याचे विस्मरण झाले आहे. कॉंग्रेसदेखील त्याला अपवाद नाही. कॉंग्रेसने निवडणुकीची तयारी किती तरी अगोदर सुरू करावयास हवी होती. ती झाली नाही आणि कॉंग्रेसकडे कार्यकर्त्यांचे जाळेही नाही. या सगळ्याचा परिणाम भाजपला पुन्हा सत्ता मिळण्यात झालाच.

मात्र, कॉंग्रेसची स्थिती दयनीय होण्यातही झाला. कॉंग्रेसला पुन्हा सशक्‍तपणे उभे राहायचे असेल तर हस्तिदंती मनोऱ्यांमधून बाहेर पडून जमिनीवर काम करणारे कार्यकर्ते तयार करण्यावाचून पर्याय नाही. तथापि हेही खरे की कार्यकर्ते हे नेत्याच्या मागे येतात. गांधी यांना त्यासाठी दोन उदाहरणे समोर ठेवता येतील. एक, जगनमोहन रेड्डी यांचे, तर दुसरे नवीन पटनाईक यांचे. भाजपची देशभर सुप्त लाट असतानाही या दोघांनी आपापल्या राज्यात विजयश्री खेचून आणली. हे सहजसाध्य नव्हते. नेत्यांची मेहनत हे त्यामागचे खरे कारण. राहुल यांनी ते डोळ्यासमोर ठेवले पाहिजे.

आंध्र प्रदेशात यंदाच्या निवडणुकीत जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर कॉंग्रेसने घवघवीत यश मिळविले. वास्तविक वायएसआर रेड्डी यांच्या अपघाती निधनानंतर कॉंग्रेसने जगनमोहन रेड्डी यांना सामावून घेतले नाही. किंबहुना अनेक आमदार जगनमोहन रेड्डी यांनाच मुख्यमंत्री करण्याच्या मताचे असतानाही कॉंग्रेसच्या शीर्षस्थ नेतृत्वाने ती मागणी मान्य केली नाही. तेव्हा मग जगनमोहन रेड्डी यांनी 2009 मध्ये आदरांजली यात्रा काढली. वायएसआर रेड्डी यांच्या निधनानंतर शोकाकुल झालेल्या आणि त्यापायी आत्महत्या केलेल्यांच्या कुटुंबीयांना आणि शोकाने प्रकृतीवर विपरीत परिणाम झालेल्यांना भेटण्यासाठी ती यात्रा होती.

कॉंग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला ती यात्रा पसंत पडली नाही आणि त्यांनी जगनमोहन रेड्डी यांना ती यात्रा आटोपती घेण्यास सांगितले. तरीही हा आपला वैयक्‍तिक निर्णय आहे, असे सांगून रेड्डी यांनी यात्रा सुरूच ठेवली आणि पहिली ठिणगी पडली. लवकरच केंद्रीय नेतृत्वाशी मतभेद विकोपाला गेले आणि जगनमोहन रेड्डी यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकत नव्या पक्षाची घोषणा केली. सीबीआयने आर्थिक गुन्हेगारीत जगनमोहन यांच्यावर खटला भरला. जगनमोहन रेड्डी यांना तुरूंगवास देखील झाला. अर्थात या सगळ्याचा परिणाम पुढच्या विधानसभा निवडणुकीत फारसा झाला नाही. किंबहुना तेलगू देसमला 2014 च्या निवडणुकीत सत्ता मिळाली. 2017 मध्ये जगनमोहन रेड्डी यांनी तीन हजार किलोमीटरची पदयात्रा काढली.

राज्यातील 125 विधानसभा मतदारसंघातून ती पदयात्रा निघाली आणि तब्बल 430 दिवस चालली. या वर्षाच्या सुरुवातीला तिचे समापन झाले. दोन कोटी नागरिकांना ते वैयक्‍तिकरित्या भेटले आणि दरम्यान खटल्यांच्या संदर्भात दर आठवड्याला ते न्यायालयात देखील हजेरी न चुकता लावत असत. तेव्हा एकीकडे कायद्याची बूज आणि दुसरीकडे जनसंपर्क या बळावर जगनमोहन आपली प्रतिमा जनतेच्या मनात निर्माण करू शकले. वस्तुतः माध्यमांचा जगनमोहन यांना विरोधच होता. तेलगू देसमने राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी काडीमोड घेतल्यानंतर भाजपने वायएसआर कॉंग्रेसशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न केला होता, असेही म्हटले जाते. मात्र जगनमोहन रेड्डी स्वबळावर लढण्याच्या निर्णयावर ठाम राहिले आणि विधानसभा निवडुकीत घवघवीत यश मिळवू शकले. आता ते मुख्यमंत्री बनले आहेत.

ओडिशात नवीन पटनाईक यांनी सलग पाचव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्रिपुरात भाजपने दीर्घकाळच्या डाव्यांच्या सत्तेला सुरूंग लावला होता आणि ओडिशा हे दुसरे त्रिपुरा ठरेल अशा वल्गना भाजप नेतृत्वाने केल्या होत्या. मोदींच्या आक्रमक प्रचार शैलीसमोर नवीन पटनाईक यांची प्रतिमा एका सौम्य राजकारण्याची. मात्र आपल्या याच प्रतिमेच्या आणि सरकारच्या कारभाराच्या बळावर पटनाईक यांनी पाचव्यांदा निवडणूक जिंकली. गेल्या डिसेंबरमध्येच पटनाईक यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली होती. शेतकऱ्यांसाठी आणि भूमिहिनांसाठी त्यांनी सरकारी योजना जाहीर केली. अर्थात राजधानीतून योजना जाहीर करण्यावरच ते थांबले नाहीत तर जिल्हेच्या जिल्हे पालथे घातले आणि ती योजना सामान्यांपर्यंत पोचेल याची काळजी घेतली.

निवडणुका जाहीर झाल्या तेव्हाही पटनाईक मिशन शक्‍ती या सरकारी योजनेच्या कार्यक्रमात होते. एका खास बनविलेल्या बसमधून त्यांनी जनसंपर्क यात्रा काढली आणि शेकडो मैल प्रवास केला आणि सामान्यांना भेटले. अतिशय साधे राहणीमान, सौम्य प्रकृती पण प्रचारात थेट मोदींवर शरसंधान ही व्यूहरचना करून पटनाईक यांनी सलग पाचव्यांदा विजय आपल्या पक्षाला मिळवून दिला. परंतु सातत्याने वीस वर्षे सत्तेत राहिल्यानंतर ही कामगिरी केवळ अचंबित करणारी आहे. मोदींनी केंद्रात स्वबळावर पुन्हा सत्ता मिळविली ही जितकी महत्त्वाची घटना तितकीच ओडिशात पाचव्यांदा नवीन पटनाईक मुख्यमंत्री होणे ही उल्लेखनीय घटना.

कॉंग्रेस नेतृत्वाला अशी मेहनत घेतल्यावाचून पर्याय नाही. बुजुर्गांना कायम ठेवून आणि दरबारी राजकारण करून जनसमर्थन मिळेल अशा भ्रमात कॉंग्रेस असेल तर त्या पक्षाने आत्मपरीक्षण करण्याची आवश्‍यकता आहे. केवळ 52 खासदार भाजपला संसदेत पुरून उरतील अशा वल्गना करून कॉंग्रेसला उभारी घेता येणार नाही. कार्यकर्ते नेत्याच्या मागे येत असतात आणि त्यातून संघटना बांधणी होत असते. कॉंग्रेस नेतृत्वाने हे सर्व करण्याची गरज आहे; ते करण्याची इच्छाशक्‍ती कॉंग्रेस नेतृत्वापाशी आहे का, हा खरा कळीचा मुद्दा आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.