रायपूर – छत्तिसगढमध्ये मंगळवारी दोन चकमकींत सुरक्षा दलांनी 4 नक्षलवाद्यांना ठार केले. त्यामध्ये 2 महिला नक्षलींचाही समावेश आहे. नक्षलवाद्यांशी झुंजताना तेलंगण पोलीस दलाचा एक जवान जखमी झाला.
छत्तिसगढ-तेलंगण सीमेवरील चकमकीत एका महिलेसह 3 नक्षलवादी मारले गेले. नक्षलींच्या अस्तित्वाची माहिती मिळाल्यानंतर तेलंगणच्या ग्रेहाऊंडस् पथकाने मोहीम हाती घेतली. त्या मोहिमेला मदत करण्यासाठी छत्तिसगढ पोलीस आणि सीआरपीएफचे संयुक्त पथक घटनास्थळी पोहचले. त्या चकमकीनंतर 3 नक्षलींचे मृतदेह आढळले.
चकमकस्थळावरून नक्षलवाद्यांकडील रायफली, काही रॉकेट लॉंचर्स जप्त करण्यात आले. त्या चकमकीत जखमी झालेल्या जवानाला उपचारासाठी हवाई मार्गाने हैदराबादला हलवण्यात आले.
दरम्यान, छत्तिसगढच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवादी जमल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली. त्या मोहिमेवेळी दोन्ही बाजूंमध्ये चकमक झडली. त्यामध्ये मुन्नी नावाची महिला नक्षलवादी ठार झाली. तिच्यासाठी याआधीच 5 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. संबंधित चकमकींत 4 नक्षलींचा खात्मा करून सुरक्षा दलांनी त्यांच्या संघटनांना मोठा हादरा दिल्याचे मानले जात आहे.