सातारा (प्रतिनिधी) – कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या व साताऱ्यातील गार्डनसिटी येथे राहत असलेल्या महिला आरोग्य कर्मचाऱ्याला करोनाची बाधा झाल्याने तिच्यावर क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते.
या “करोना वॉरियर’ला आणि मुंबईवरून साताऱ्यातील प्रतापगंज पेठेत आलेल्या एका बाधित रुग्णाला करोनामुक्त झाल्याने रविवारी घरी सोडण्यात आले. त्याचबरोबर कराडच्या सह्याद्री रुग्णालयात दाखल असलेल्या दोन बाधितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांनाही आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील करोनामुक्त रुग्णांची संख्या 66 झाली आहे.
127 जणांचे अहवाल निगेटिव्ह
क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातील 52 आणि कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 64, अशा एकूण 116 जणांचे करोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे पुणे येथील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे. त्याचबरोबर कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजच्या प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आलेल्या 11 संशयितांचे नमुने निगेटिव्ह आल्याचे कळविण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण 127 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.