जुन्नर- “जय शिवाजी, जय भवानी’, “जय जिजाऊ जय शिवराय’, “छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या जयघोषांनी आणि भगव्या झेंड्यांनी रविवारी (दि. 19) किल्ले शिवनेरी शिवमय झाला होता. दरम्यान, शिवजन्मस्थळी म्हणजेच किल्ले शिवनेरीवर पारंपरिक वेशभूषा केलेल्या महिलांनी फुलांनी सजवलेल्या पाळण्यात बाल शिवाजी यांना ठेवण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाळण्याची दोरी ओढली अन् नऊवारी नेसलेल्या महिलांनी शिवरायांचा पाळणा गायल्यानंतर सुंठवड्याचे वाटप करत किल्ले शिवनेरीवर पारंपरिक पद्धतीने शिवजन्म सोहळा जल्लोषात साजरा करण्यात आला.
बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना
किल्ले शिवनेरीवर दिवसभर भगवे फेटे, शर्ट घालून, हातात भगवे झेंडे घेऊन आलेल्या शिवप्रेमी, छत्रपती शिवाजी महाराज, बाल शिवाजी व जिजाऊंच्या वेषातील शिवभक्तांचे शिवप्रेमींना दर्शन झाले. शिवजयंतीच्या महोत्सवानिमित्त किल्ले शिवनेरीवर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्या जवळचा परिसर भगवे झेंडे, ढोल ताशांचे जयघोषाने शिवमय झाला होता. दरम्यान, सकाळी शिवाई देवीची शासकीय महापूजा अपर जिल्हाधिकारी अजय मोरे याचे उपस्थितीत झाली. यावेळी प्रांताधिकारी सारंग कोडलकर, तहसीलदार रवींद्र सबनीस ,शिवाई देवी ट्रस्टचे पदाधिकारी व शिवभक्त उपस्थित होते.
राष्ट्रगीत तसेच “गर्जा महाराष्ट्र माझा’ राज्य गीताची धून पोलीस बॅंड पथकाने वाजवून सलामी दिली. त्यानंतर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. जुन्नर येथील छत्रपती संघर्ष मर्दानी खेळ आखाड्याच्या पथकाने मर्दानी खेळांचे चित्तथरारक सादरीकरण केले. शिवकुंज येथील बालशिवाजी व जिजाऊंच्या पुतळ्यास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी वाहीली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस या दोघांनीही पारंपरिक पगडी परिधान केली होती. यावेळी छत्रपती संभाजीराजे, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, प्रवीण दरेकर, माजी खासदार आढळराव पाटील, आमदार अतुल बेनके, शरद सोनवणे, शिवभक्त उपस्थित होते.