सातारा -ज्येष्ठ अर्थतज्ञ व येथील युनायटेड वेस्टर्न बॅंकेचे माजी अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर नारायण उर्फ पी. एन. जोशी (वय 89) यांचे आज दि. 1 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. संगम माहुलीतील कैलास स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे आहेत.
नामवंत अर्थ तज्ज्ञ म्हणून देशभर ओळख असलेल्या जोशी यांचा जन्म चिक्कोडी (कर्नाटक) येथे झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण चिक्कोडी व बेळगाव या ठिकाणी झाले. उच्च शिक्षणासाठी ते मुंबईत आले. मुंबई विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र व इतिहास या विषयांतून पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या अर्थशास्त्र विभागात सुमारे 15 वर्ष काम केल्यानंतर ते त्याच ठिकाणी वरिष्ठ अधिकारी झाले. त्यानंतर त्यांनी बॅंक ऑफ इंडियात महाव्यवस्थापक म्हणून काम केले. तेथील त्यांच्या कामाची दखल घेत रिझर्व्ह बॅंकेने त्यांची युनायटेड वेस्टर्न बॅंकचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड केली.
युनायटेड वेस्टर्न बॅंकेच्या प्रगतीत 1990 ते 2000 या दहा वर्षाच्या काळात त्यांनी मोठे योगदान दिले. या काळात त्यांनी बॅंकेच्या कामकाजात आमुलाग्र बदल केले. संगणकीकरण, एटीएम केंद्र, फॉरेन एक्सचेंज, पब्लिक इश्यू राईटस् या राबविलेल्या अभिनव उपक्रमांची चांगली चर्चा झाली. त्यानंतर ते सारस्वत सहकारी बॅंकचे बॅंकिग डायरेक्टर म्हणून कार्यरत होते.
युनायटेड वेस्टर्नचे माजी जनरल मॅनेजर रत्नाकर तांडेल, सदाशिव क्षीरसागर, माजी व्यवस्थापक अनंत जोशी, बॅंकेच्या अधिकारी संघटनेचे माजी अध्यक्ष डी. आर. देशपांडे, जनरल सेक्रेटरी दत्तात्रय भिडे, आयडीबीआय बॅंक अधिकारी संघटनेचे माजी अध्यक्ष दिलीप वेलणकर, अध्यक्ष गोपाल जरे, सचिव भालचंद्र दामले आदींनी श्रद्धांजली वाहिली. ज्येष्ठ करसल्लागार अरूण गोडबोले, विश्वास दांडेकर, साताऱ्याचे माजी नगराध्यक्ष प्रकाश गवळी, नगरसेविका स्नेहलता नलावडे, पूर्वा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. चंद्रकांत नलावडे, मराठा सेवा संघाचे युवराज पवार यांच्यासह विविध मान्यवरांनी त्यांचे अत्यंदर्शन घेतले.