हडपसर : मतदार यादी व बूथ कमिटी हे या सर्व संघटनात्मक बांधणीचा पाया असून, संपूर्ण पक्ष संघटना ही या पायावर मजबूतपणे उभी आहे. हा पाया अधिकाधिक भक्कमपणे मजबूत केल्यास येत्या महानगरपालिका निवडणुकीत आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महापौर होणार याबाबत माझ्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही ,असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
‘संवाद कार्यकर्त्यांशी, पक्षाच्या केंद्रबिंदूशी’ या संकल्पनेसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात ‘राष्ट्रवादी परिवार संवाद” हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या संवाद यात्रेत वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवनात कार्यकर्त्यांनशी संवाद साधताना ते बोलत होते.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे, खासदार वंदना चव्हाण, महिला प्रदेशध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, सुनील गव्हाणे, शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार चेतन तुपे,आमदार सुनील टिंगरे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले यांची प्रमुख उपस्थिती होती.
वडगावशेरी, हडपसर, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट या चारही विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेण्यात आली. यासाठी सर्व आजी-माजी नगरसेवक,सर्व सेल अध्यक्ष,कार्यकारणी सदस्य व मोठ्या प्रमाणात पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
“ज्येष्ठ नेत्यांसोबत थेट संवाद होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यातच जनता आता महापालिकेतील भ्रष्टाचारी सत्ताधाऱ्यांना कंठाळली आहे. त्यामुळे महापालिकेत परिवर्तन हे अटळ आहे.”
प्रशांत जगताप,शहराध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर